संजदमध्ये फूट पाडण्याचे राजदचे प्रयत्न
केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ
वृत्तसंस्था /पाटणा
राष्ट्रीय जनता दलच संयुक्त जनता दलात फूट पाडू पाहत असल्याचा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते नित्यानंद राय यांनी गुरुवारी केला आहे. संजद आता कुठलाही जनाधार नसलेला पक्ष ठरला आहे. नितीश कुमार हे हताश आणि निराश झाले आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या सर्व कृत्यांबद्दल नितीश कुमारांना माहिती असल्याचे राय म्हणाले. तेजस्वी यादव आणि ललन सिंह यांच्यात वाप्युद्ध सुरूच आहे. जेथे कुठलेही धोरण आणि मूल्याशिवाय तडजोड होते तेथेच अशाचप्रकारे घडत असते. महाआघाडी सरकारने बिहारचे नुकसान केले आहे. राज्याची बदनामी होत असून लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून गुन्हेगार उघड गोळीबार करत आहेत. वाळूमाफिया आणि गुन्हेगार शिरजोर झाले असल्याचा आरोप नित्यानंद राय यांनी केला आहे.
बिहारमध्ये महाआघाडीच्या विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही राज्यातील सर्व 40 जागा जिंकू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भगिरथ प्रयत्नांमुळे विकासाची गंगा बिहारमध्ये वाहत आहे. विकासाला रोखण्याचा प्रयत्न आता महाआघाडीकडून केला जात असला तरीही आम्ही तो रोखू देणार नसल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. काँग्रेस आता एक कुटुंबाचा पत्र ठरला आहे. पंतप्रधान मोदींना उद्देशून काँग्रेस नेते आक्षेपार्ह टिप्पणी करत आहेत. काँग्रेस तसेच त्याच्या सहकारी पक्षांना आता जनताच धडा शिकविणार असल्याचे राय म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच बिहारच्या दौऱयावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वात गृहमंत्र्यांनी देशाची अंतर्गत सुरक्षा भक्कम केली आहे. कलम 370 हद्दपार करणे आणि राम जन्मभूमीवर मंदिर उभारणी करण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात झाला असल्याचे राय म्हणाले.