नवी दिल्लीत राजद अन् काँग्रेसची बैठक
राहुल गांधी, खर्गेंशी तेजस्वी यादवांची चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीवरून राजकीय पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी पाटणा येथे रालोआची बैठक झाली होती. तर सोमवारी दरभंगा येथे रालोआचे सर्व प्रमुख नेते एकजूट झाले होते. तर मंगळवारी दिल्लीत राजद आणि काँग्रेसच्या नेत्यांदरम्यान बैठक झाली आहे. बिहारमधील विरोधी पक्षनेत आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत राजदच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही भाग घेतला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी पूर्णपणे तयार आहे. आगामी निवडणुकीत जागावाटपासमवेत अनेक मुद्द्यांवर मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दीर्घकाळापासून एकत्र आहेत. बिहारच्या निवडणुकीला आता 6-7 महिन्यांचा कालावधी राहिला असल्याचे वक्तव्य राजद खासदार मनोज झा यांनी पेले आहे.
काँग्रेस यावेळी देखील बिहारमध्ये 70 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी आग्रही ओ. परंतु काँग्रेसला 2020 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 19 जागांवरच विजय मिळाला होता. तर डावे पक्ष देखील स्वत:च्या विजयाची टक्केवारी मांडत अधिक जागांची मागणी करत आहेत. तर राजद कुठल्याही स्थितीत 150 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. मागील विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये राजदचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते.
तर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून आगामी काळात कुठलाही वाद होऊ नये म्हणून राजदने मंगळवारच्या बैठकीत यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला असल्याचे समजते. राजदने यापूर्वीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.
काँग्रेस अधिक आक्रमक
काँग्रेसची भूमिका यावेळी काहीशी बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने अलिकडेच स्वत:चा प्रदेशाध्यक्ष बदलला आहे. उच्चवर्णीय समुदायाशी संबंधित अखिलेश सिंह यांच्या जागी काँग्रेसने दलित नेते राजेश कुमार यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. यानंतर कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वात पक्षाने पदयात्रा काढली आणि राहुल गांधी देखील यात सामील झाले. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना स्वत:च्या मतदारसंघात जात मेहनत करण्याचा निर्देश दिला आहे. यातून काँग्रेस बिहारमध्ये स्वत:साठी अधिक भूमिका इच्छित असल्याचे स्पष्ट होते.