For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नद्या पात्राबाहेर, सतर्कतेचा इशारा

06:59 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
नद्या पात्राबाहेर  सतर्कतेचा इशारा
Advertisement

पाणलोट क्षेत्रात मुसळधार, धरणातून विसर्ग वाढला : वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ : अधिकाऱ्यांकडून पाहणी

Advertisement

प्रतिनिधी/ चिकोडी

गेल्या चार दिवसांपासून चिकोडी उपविभागात तसेच धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी संभाव्य महापुराचा धोका वाढला आहे. नद्यांची पूरपातळी वाढत असल्यामुळे तालुका प्रशासनही सतर्क झाले असून तहसीलदार व तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. दरम्यान नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरु असलेला विसर्ग यामुळे वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. याबरोबरच चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील अनेक पूल वजा बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक अन्य मार्गावरुन सुरु आहे.

Advertisement

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी दुपारी 3 वाजता कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 9 फुटावरून 11 फुटापर्यंत उघडून तेथून 78 हजार 421 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून जलाशय परिचलनसूचीप्रमाणे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून मंगळवारी सायंकाळी 4 वाजता वक्री दरवाजाद्वारे सुरू असलेला 28 हजार 355 विसर्ग वाढवून तो 34 हजार 732 क्युसेक करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळच्या माहितीनुसार अलमट्टी जलाशयामध्ये प्रतिसेकंद 88 हजार 126 क्युसेक पाणी वाहून येत असून 1 लाख 35 हजार 880 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. राजापूर बंधाऱ्यातून कृष्णेमध्ये 72 हजार 833 क्युसेक पाण्याचा प्रवाह येत आहे. दूधगंगा नदीतून 21 हजार 824 क्युसेक पाण्याचा प्रवाह वाहून येत आहे. कल्लोळ बंधाऱ्याजवळ एकूण कृष्णा नदी पात्रात कर्नाटकात प्रतिसेकंद 94 हजार 697 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी दुपारनंतर अलमट्टी जलाशयातून पाण्याचा विसर्ग 1 लाख 50 हजार ते 1 लाख 75 हजार क्युसेक असा वाढविण्यात आला आहे.

पावसाची संततधार दिवसभर सुरूच

गेल्या चार दिवसांपासून चिकोडी उपविभागात पावसाची संततधार अखंडितपणे सुरूच आहे. परिणामी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पण पावसामुळे नागरिकांची इतर कामेही खोळंबली आहेत. शेतातही पावसाने चिखल असल्याने जनावरांच्या वैरणीचा तुटवडा भासत आहे. पूरपातळी वाढत असल्याने शेतकऱ्यांना नदीकाठी बसविण्यात आलेले पंपसेट पुन्हा काढून घरी आणावे लागत आहेत.गत चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून संभाव्य पूरग्रस्त गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. यासाठी खबरदारीच्या सूचना देण्यासाठी व पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार राजेश बुर्ली, उपतहसीलदार पी. बी. शिलवंत, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी के. ए. वन्नूर आदी अधिकाऱ्यांनी जनवाड, सदलगा, मलिकवाड, कल्लोळ आदी गावांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.

पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे दूधगंगा व कृष्णा नद्यांना महापुराची शक्यता वर्तविली जात असून संबंधित गावातील नागरिकांनी स्वत: व जनावरे नदीकडे घेऊन जाऊ नये, नदीचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरू नये, नदीकाठी असलेल्या वसाहतींनी सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. संबंधित पूरग्रस्त गावातील पूरग्रस्तांना स्थलांतरीत करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांचीही अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी बोरगाव-सदलगा दरम्यान असलेल्या जनवाड येथील गावाला भेट देऊन तेथील लोकप्रतिनिधींशीही चर्चा केली. यानंतर सदलगा, मलिकवाड येथे दूधगंगा व कल्लोळ येथेही कृष्णा नदीकाठावर जाऊन पूरस्थितीची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार राजेश बुर्ली, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी के. एन. वन्नूर, उपतहसीलदार पी. बी. शिलवंत, महसूल निरीक्षक एम. ए. नागराळे, आर. आय. नाईक, तालुका पंचायतीचे रोजगार हमी योजनेचे साहाय्यक संचालक शिवानंद शिरगावे, जनवाडचे ग्राम प्रशासकीय अधिकारी पी. बी. कलगे यांच्यासह संबंधित गावातील ग्राम प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत विकास अधिकारी उपस्थित होते.

दिवसात 7 फुटाने पाणीपातळी वाढली

चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने चिकोडी विभागातील नद्यांना पूरस्थित उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून नदीकाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. गेल्या 24 तासांत पाच ते सात फुटाने पाणी वाढले असून वेदगंगा व दूधगंगा आता पूरस्थितीकडे जात आहेत. महाराष्ट्रातील धरण क्षेत्रातून व पावसामुळे येत असलेले पाणी एक लाख क्युसेक येत असल्याने पुराचे सावट आहे.

8 बंधारे पाण्याखाली, पण पर्यायी रस्ते खुले

चिकोडी विभागात वेदगंगा, दूधगंगा नद्यांचे पाणी दोन दिवसांपासून पात्राबाहेर आहे. त्यातच संततधार पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर व सर्वच धरणे भरल्याने विसर्ग वाढविल्याने हे पाणी चिकोडी विभागातील विविध नद्यांमधून येत आहे. त्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चिकोडी विभागात वेदगंगा व दूधगंगा नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली गेले असून कुठल्याही भागाचा अद्याप संपर्क तुटलेला नाही. सर्व गावांना पर्यायी रस्ते उपलब्ध असले तरी नदीकाठावरील लोक भयभीत झाले आहेत. चिकोडी विभागात सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.

विसर्गाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष

राजापूरजवळ 75 हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे. तर सदलगाजवळ दूधगंगा नदीत 23 हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे. दोन्ही मिळून 98 हजार क्युसेक पाणी कल्लोळजवळ कृष्णा नदीत वाहून येत आहे. मंगळवारी कोयना, राधानगरी, काळम्मावाडी धरणांतून विसर्ग वाढला असल्याने पुन्हा दोन दिवस पाणी अधिक वाहून येणार आहे. कोयनेचे पाणी कृष्णेला मिळत असल्याने याचा  वेदगंगा व दूधगंगेलाही फटका बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस व धरणांतील विसर्गाकडे येथील प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच सर्व गावांत नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

यंदाचे सर्वाधिक पाणी

मे मध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. तर जूनमध्येही चांगला पाऊस झाला होता. मे पासून आतापर्यंत चिकोडी विभागातील अनेक बंधारे पाच ते आठवेळा पाण्याखाली गेले आहेत. आता दोन दिवसांत संततधारेमुळे पुन्हा धरणे पाण्याखाली गेली असून आतापर्यंत आलेल्या पाण्यापेक्षा यावेळी नद्यांचे पाणी वाढले आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढल्यास पुराची धास्ती नदीकाठावरील गावांना कायम आहे.

अलमट्टीतून पावणे दोन लाख क्युसेक विसर्ग

अलमट्टी जलाशयात गेल्या आठवड्यात 121 टीएमसीपेक्षा अधिक पाणी भरले होते. जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार होते तोपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी तीन टप्प्यात सव्वा लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. मंगळवारी हा विसर्ग सकाळी व दुपारी अशा दोन टप्प्यात वाढवून 1 लाख 75 हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी वाहून येण्याच्या प्रमाणात अधिक पाणी विसर्ग केल्याने पातळी कमी झाली आहे. मंगळवारी धरणात 113 टीएमसी पाणी साठा होता. आणखी विसर्ग वाढविण्यासाठी अलमट्टी प्रशासनाकडून धरणाच्या खालील बाजूस अलर्ट दिला आहे. मंगळवारी धरणात दीड लाख क्युसेक पाणी वाहून येत होते.

दूधगंगा, वेदगंगेची पाणी पातळी आणखी वाढणार : काळम्मावाडीतून 25000 क्युसेकने विसर्ग सुरू

वार्ताहर/ निपाणी

काळम्मावाडी धरणातून मंगळवारी दिवसभर 18,500 क्युसेकने विसर्ग सुरू होता. संध्याकाळी 7 नंतर यात वाढ करून एकूण 25000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दूधगंगा आणि वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत बुधवारी सकाळपर्यंत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 25000 क्युसेकने बुधवारी सकाळपर्यंत पाणी निपाणी भागात पोहोचल्यास इशारा पातळी ओलांडून धोका पातळी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास बुधवारी सकाळपासून नदीकडच्या गावांमध्ये स्थलांतर मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.