For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यातील नदी-नाल्यांनी गाठला तळ

11:18 AM May 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांनी गाठला तळ
Advertisement

शहरातील पाणीपुरवठ्यासाठी बंधाऱ्याची उंची वाढवणे गरजेचे

Advertisement

खानापूर : गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या उष्ण हवामानामुळे आणि कडक उन्हामुळे तालुक्यातील सर्वच नदी, नाले, विहीर, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी एकदम खालावली आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. तर मलप्रभा नदी कोरडी पडली आहे. खानापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळील पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना कूपनलिकांवरच अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामीण भागातही कूपनलिकांनी तळ गाठल्याने पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. तर मलप्रभा नदी कोरडी पडल्याने जागोजागी डबकी साचली आहेत.

खानापूर तालुक्यातील नदी-नाल्यानी आणि कूपनलिकानी तळ गाठल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच वळिवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी लागणारी विजही वेळेवर नसल्याने पिके सुकून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. तसेच जंगलातील नदी नाले आणि जंगली प्राण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तळीही पूर्णपणे आटल्याने पाण्यासाठी जंगली जनावरांचा ओघ आता ग्रामीण भागातील वस्तीकडे वळलेला आहे. त्यामुळे जंगली जनावरेही पाण्यासाठी भटकत गावाजवळ वावरत आहेत. परिणामी ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाण्याच्या शोधात आलेली जंगली जनावरेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Advertisement

मागीलवर्षी पावसाळा मुबलक आणि लांबलेला होता. मात्र जानेवारीनंतर हवामानात प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने पाण्याचे स्त्रोत गेल्या दोन-तीन महिन्यात झपाट्याने कमी झाले. आणि मे च्या पहिल्या आठवड्यातच सर्व नदी, नाले कोरडे पडलेले आहेत. आणि पाणी पातळी खालावलेली आहे. पुढील दीड महिना तरी पाऊस होणार नसल्याने पाणी समस्या गंभीर बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. मलप्रभा नदीवर जागोजागी ब्रिजकम बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र या बंधाऱ्याचे योग्य नियोजन तसेच योग्य पद्धतीने पाणी अडवण्यात येत नसल्याने नदीतील पाणी वाहून जात आहे.ाs सर्व बंधाऱ्यांतून पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने पाणी अडवताना योग्य पद्धतीने पाणी अडवणे गरजेचे आहे. वेळोवेळी मागणी करुनदेखील पाटबंधारे खाते पाणी अडवण्याकडे दुर्लक्षच करत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.

शहरातील पाणीपुरवठ्यासाठी बंधाऱ्याची उंची वाढवणे गरजेचे

शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या पुलाजवळ गेल्या पाचवर्षापूर्वी ब्रिजकम बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या बंधाऱ्याचेही योग्य नियोजन आणि आवश्यक असणारी बंधाऱ्याची उंची नसल्याने शहराचा पाणीपुरवठा प्रश्न गंभीर बनला आहे. मलप्रभा नदीतील ब्रिजकम बंधाऱ्याच्यावरील बाजूने ते जॅकवेलपर्यंत नदीच्या पात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे. अवघ्या पाच वर्षात बंधाऱ्यात चौदा मुशीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा येऊन साचल्याने या ब्रिजकम बंधाऱ्यात पाणी अडवल्यानंतरही म्हणावा तितका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी नदीची खोली आणि बंधाऱ्याची उंची किमान दहा फूट वाढविणे गरजेचे आहे. शहरासाठी नवी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर झाला असून 10 लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. आणि नव्याने नळकनेक्शन देण्यात येणार आहे. मात्र या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या पाणी स्त्रोत्राचे नियोजन करण्यात आलेले नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनीही याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी याबाबत गांभीर्याने घेऊन बंधाऱ्याची उंची वाढवण्याचा ठराव संमत करून तसा आराखडा पाटबंधारे खात्याकडे पाठवणे गरजेचे आहे. अन्यथा दोन-चार वर्षात ब्रिजकम बंधाऱ्याजवळ साचणाऱ्या वाळुमुळे बंधाऱ्यात पाणीसाठाच उपलब्ध होणार नाही. यासाठी तज्ञांकडून उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.