मंत्रिपदांचा तिढा दिल्ली दरबारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना
प्रतिनिधी, मुंबई :
महायुतीला भरघोस मतदान होऊनही मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्याप्रमाणे मंत्रिपदांचाही तिढा निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीतल्या तिन्ही पक्षांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्ली दरबारी रवाना झाले आहेत.
आमच्यामुळेच महायुतीला यश मिळाले, असा दावा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा होता. अखेर हा दावा दिल्ली दरबारी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा वाद मिटला आणि निडणूक निकालानंतर बारा दिवसांनी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर त्वरित मंत्रिमंडळ स्थापन होईल, अशी अपेक्षा होती. पण ‘तीन तिघाडा आणि काम बिघाडा’ अशी अवस्था महायुतीची झाली आहे.
मुख्यमंत्रीपद नाही तर नाही, मग त्याखालोखालचे गफहमंत्रीपद तरी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेनेची आहे. पण भाजप ते पद सोडायला तयार नाही. गफहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडे; निदान भाजपकडे असायला हवे अशी भाजपची धारणा आहे. राज्यातल्या घडामोडींची गुप्तवार्ता राज्याचे मुख्य चालक असलेल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कळलीच पाहिजे, हे त्यामागचे मुख्य कारण आहे. गफहमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच आहे.
रात्रीस खेळ चाले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मंगळवारी रात्री दीड वाजेपर्यंत मेघदूत बंगल्यावर चर्चा झाली. मंत्रिमंडळात किती मंत्री असावेत, किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री असावेत आणि कुणाला कोणती खाती द्यावी याची चर्चा त्या बैठकीत झाली. त्या बैठकीत पालकमंत्रिपद आणि महामंडळावरही चर्चा झाल्याचे समजते. मात्र, गफहमंत्रिपद आणि महसूल मंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने आमदारांना मंत्रिपदाची शपथही देता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न आता थेट अमित शहा यांच्या दरबारात गेला आहे.
भाजपाच्या आमदारांचे रिपोर्टकार्ड मागवून घेतले
भाजपच्या 136 आमदारांपैकी जुन्या आमदारांचे रिपोर्टकार्ड अमित शहा यांनी मागवून घेतले आहेत. त्याबाबतची माहिती बावनकुळे यांच्याकडून घेण्यात येईल. भाजपच्या वाट्याला 20 मंत्रिपदे असताना त्यांची वाटणी 136 आमदारांमध्ये कशी करायची, त्यासाठी रिपोर्ट कार्ड महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार : संजय शिरसाट
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. त्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. कुणी काय निर्णय घ्यायचा हा संपूर्ण अधिकार या तिन्ही प्रमुख नेत्यांना आहे. भाजप आमदारांची सदस्यसंख्या जास्त आहे. त्यामुळे संभ्रम कुठलाही नाही. त्यांना अधिक संधी मिळावी, ही अपेक्षा प्रत्येकाची आहे. निर्णय घेताना थोडीशी कसरत निश्चित होत आहे. पण आता कुठलाही घोळ नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला
मागील अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेचे अनेकजण मंत्रिपदाविना राहिले. त्यापैकी भरत गोगावले हे खास उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे. सर्वांनाच संधी मिळावी यासाठी अडीच-अडीच वर्षांचा फार्म्युला ठेवण्यात येणार आहे. सुऊवातीला अडीच वर्षे मंत्रीपद, त्यानंतरच्या अडीच वर्षानंतर नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.