स्मार्टफोन, संगणकांवरील प्रतिद्वंद्वी कर मागे
सेमीकंडक्टर, सोलर सेल, मेमरी कार्ड यांनाही सूट; अमेरिकन टेक कंपन्यांना दिलासा
वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजेच प्रतिद्वंद्वी करातून सूट दिली. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने परदेशी वस्तूंवर शतकातील सर्वाधिक शुल्क लादले असताना ही घोषणा करण्यात आली. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोल (सीबीपी) ने एक नोटीस जारी करत सुधारित निर्णयाची घोषणा केली. या सूटमध्ये चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या स्मार्टफोन आणि त्यांच्या उपकरणांसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. ज्यावर सध्या 145 टक्के अतिरिक्त दर आकारण्यात येत होता.
सीबीपीच्या सूचनेत सेमीकंडक्टर, सोलर सेल, फ्लॅट पॅनल टीव्ही डिस्प्ले, फ्लॅश ड्राइव्ह आणि मेमरी कार्ड यांनाही सूट देण्यात आली आहे. हा निर्णय अनेक अमेरिकन टेक कंपन्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या कंपन्यांनी अलिकडेच चिंता करत टॅरिफ निर्णयामुळे अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढू शकतात, कारण अनेक उत्पादने चीनमध्ये बनतात, असे म्हटले होते. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपन्यांसाठी विशेषत: अॅपलसाठी सुधारित टॅरिफ सूट हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.