ऋतुराज गायकवाडचे आक्रमक शतक
महाराष्ट्राचा सलग दुसरा विजय
वृत्तसंस्था/ मुंबई
ऋतुराज गायकवाड (16 चौकार, 11 षटकारासह नाबाद 148) तुफानी शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसरा विजय मिळवला. सोमवारी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने सेनादलाचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना सेनादलाचा संघ 204 धावांत ऑलआऊट झाला. प्रत्युत्तराने महाराष्ट्राने विजयी लक्ष्य एका गड्याच्या मोबदल्यातच पूर्ण केले. नाबाद शतकी खेळी साकारणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत सेनादलाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. कर्णधार ऋतुराज गायकवाडचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सेनादलाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सुरज वशिष्ठ (22) व रवि चौहान (8) हे स्वस्तात बाद झाले. यानंतर कर्णधार मोहित अहलावटने 10 चौकारासह 61 धावांचे योगदान दिले. कर्णधार अहलावट वगळता पूनम पानिया (26), अर्जुन शर्मा (24), रजत पालिवाल (22) धावा केल्या. इतर सेनादलाच्या फलंदाजांना मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सेनादलाचा डाव 48 षटकांत 204 धावांत संपला.
ऋतुराजचा शतकी तडाखा
205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाड आणि ओम भोसले यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये 86 धावांची सलामी भागीदारी झाली. भोसले 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर सिद्धेश वीरने कर्णधाराला शेवटपर्यंत साथ दिली. ऋतुराजने अवघ्या 74 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 148 धावा केल्या. ऋतुराजने सेनादलाच्या गोलंदजांची धुलाई करताना 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार आणि 11 षटकार मारले. ऋतुराजच्या या तुफानी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने विजयी आव्हान 20.2 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. दरम्यान, ऋतुराजचे विजय हजारे ट्रॉफीतील हे 13 वे शतक ठरले. आतापर्यंत त्याने या स्पर्धेच्या इतिहासात 13 शतके झळकावली आहेत. या यादीत फक्त अंकित बावणे त्याच्या पुढे आहे, ज्याने या स्पर्धेत 14 शतके झळकावली आहेत.
मुंबईचा हैदराबादवर अडखळत विजय
अहमदाबाद : विजय हजारे ट्रॉफीतील क गटातील एका सामन्यात मुंबईने हैदराबादचा तीन गडी राखून पराभव केला. मुंबईचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा डाव 38.1 षटकांत 169 धावांत आटोपला. तन्मय अगरवालने सर्वाधिक 64 धावा केल्या तर अविनाशने 52 धावांचे योगदान दिले. इतर हैदराबादच्या फलंदाजांनी मात्र हजेरी लावण्याचे काम केले. प्रत्युत्तरात मुंबईलाही विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. मुंबईने विजयासाठीचे लक्ष्य 25.2 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 44 धावा केल्या. तनुष कोटियनने 39 तर सुर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले.