ऋतुराज गायकवाड यॉर्कशायरमध्ये दाखल
वृत्तसंस्था/लीड्स
भारताचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड आता इंग्लंडमध्ये इंग्लीश कौंटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत यॉर्कशायर क्लबकडून खेळणार आहे. या स्पर्धेतील होणाऱ्या वनडे चषक त्याचप्रमाणे डिव्हीजन-1 प्रकारात तो यॉर्कशायर संघाकडून पाच सामने खेळणार आहे.
जुलै महिन्यात यॉर्कशायर आणि सरे यांच्यात इंग्लीश कौंटी स्पर्धेतील सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात तो यॉर्कशायर संघाचे प्रतिनिधीत्व करेल. 28 वर्षीय ऋतुराज गायकवाड हा सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या इंडिया अ संघाचा प्रतिनिधी आहे. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका अनिर्णीत राहिली आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले होते. तसेच तो रणजी सामन्यात महाराष्ट्र संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 23 टी-20 आणि 6 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. पुण्यात स्थायिक असलेला गायकवाड हा सलामीचा फलंदाज असून तो भविष्य काळात भारतीय संघात आघाडीचा फलंदाज राहिल. इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत डिव्हिजन प्रकारात 10 संघांचा समावेश असून सध्या या स्पर्धेच्या गुणतक्त्यात यॉर्कशायरचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.