For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऋतूराज आज वनी आला...4

06:03 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऋतूराज आज वनी आला   4
Advertisement

वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचे पूजन, तिच्या निर्माण होण्याची कथा खरं तर सृष्टी निर्माण झालेली होती, ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारत होती.  एक अद्वितीय कल्पना असावी तशी पण हे सगळं बघतांना याच्यात काहीतरी राहून गेलंय असं ब्रह्मदेवाला वारंवार वाटायला लागलं. सर्वत्र उदासवाणं वातावरण होतं. नुसत्या हलणाऱ्या बाहुल्या, एखादं चित्र रेखाटावं तसं हे सगळं दिसत होतं. शेवटी ब्रह्मदेवाने या विश्वाच्याच देवतेला प्रार्थना केली आणि कमंडलुतील पाणी पृथ्वीवर सांडलं. त्या पाण्यातून चतुर्भुज, विणाधारीने मयूर वाहनावर विराजमान झालेले पुस्तक धारणी, योगेश्वरी, सरस्वती निर्माण झाली. जिच्यामुळे या चराचराच्या सर्व जीव जंतूंना निसर्गाला एक स्वर मिळाला. मनुष्य प्राण्याला वाणी मिळाली आणि एक सुंदर सुस्वर राज्य सुरू झालं. ध्वनीलाच कर्ण तृप्त करणारा दिवस म्हणजे वसंत पंचमी. म्हणून हे पूजन खूप महत्त्वाचे ठरते. अव्यक्ताला वाणीमुळे व्यक्तता आली. पक्ष्यांचे कूजन सुरू झाले. माणसाचे गायन सुरू झाले. प्राण्यांना स्वर मिळाला. साऱ्या आकाशालाच शब्द ब्रह्माचं रूप आलं. वाऱ्याला मुरलीचा नाद आला आणि सागराला सुंदरशी गाज. भावनांना जाग आली, नेणीवेला जाणीव आली, तो हा दिवस. कोकिळेला पंचम स्वर लाभला तो हा दिवस. म्हणूनच या उत्सवात माणसं गातात, नाचतात, देवाची आळवणी करतात, वाद्यांचे आवाज सुरू होतात, सकाळपासून कोकीळ सुरांनी ह्या पृथ्वीला जाग येते. मोराचे ओरडणे पावसाळी मेघांना साद घालते, चिमण्यांचे चर्पट स्वर आणि रात किड्यांचे सामवेद गायन, पानांची सळसळ वाऱ्याचं अस्तित्व प्रकट करते कारण या सगळ्यातूनच सरस्वती प्रकट होत असते. ती वसंतामध्ये फक्त आम्हाला जाणवते म्हणून हा ऋतू संहार (समुच्चय) देखणा ठरतो. संतांचे आवाज थेट आकाशापर्यंत पोचवतो. बांबूच्या वनात बासरी होऊन वारा शिळ घालत धिंगाणा घालत असतो. हे सगळं पाहिल्यावर या ऋतूला ‘ स्प्रिंग कॉकटेल’ असं का म्हणतात? याची जाणीव होते. विविध फळं, फुलं, अत्तरं, वेगवेगळ्या स्वादांचे जेवण, अन् मस्ती हे सगळं मनाचं संतुलन बिघडू न देता सुसंवाद साधणारा हा ऋतू. म्हणून तर हा ऋतुराज. हा वसंत ऋतू म्हणजे साक्षात काम देवाचा मुलगा, या ऋतूतला प्रत्येक क्षण नखरेल चवदार आणि रंगदार होळी आणि रंगपंचमी म्हणजे माणसाची रसिकता आणि रंग वर्षावाचा उत्कट मिश्रणाचा परिपाक. हा वसंत ऋतू नेमका कधी येतो आणि कधी निघून जातो याची कधीच आपल्याला जाणीव होत नाही. कारण सर्वत्र तोच भरून राहिलेला असतो. याची एक कथा काका कालेलकरांनी आपल्या ‘पुष्प साधना’ या लेखामध्ये फार सुंदर केलीये. वसंताच्या आधीची होणारी पानगळ जमिनीच्या पोटात गेली की त्याचे पाचू बनतात. हेच पाचू आम्ही दागिने म्हणून अंगाखांद्यावर मिरवले की त्याचे गळ्यातून सुस्वर होऊन बाहेर पडतात आणि हे स्वर जेव्हा आकाशाला पोहोचतात तेव्हा त्याचे सुंदर पक्षी होतात. हे पक्षी जेव्हा वृक्षावर विसवतात तेव्हा त्यांची सुंदर देखणी फुलं होतात. या फुलांना वाऱ्याचे पंख मिळाले की त्यांची सुंदर फुलपाखरं बनतात. असा हा अव्याहत वसंताचा प्रवास चालूच असतो, बारा महिने 24 तास. आपल्याभोवती तो वेगवेगळ्या ऋतूंची नावे घेऊन वावरत जरी असला तरी त्याची प्रत्यक्ष गाठ या वसंत पंचमीला पडते. वसंत ऋतुच्या निमित्ताने लाल, पिवळ्या केशरी, फुलांच्या बरसातीतून, पांढऱ्या शुभ्र सुगंधी मोगऱ्यातून चाफ्यातून, जणू चंदनाचे गंध लावूनच हा वसंत आम्हाला भेटत राहतो. पळसाच्या गालावर लाली येईपर्यंत तो लपून राहिलेला असतो पण हा वसंत आमच्या मनाच्या दारातून अगदी जवळ येऊन ठेपतो आणि आमच्या सगळ्या जगण्याचा नूरच पालटतो. म्हणून हा ऋतुराज कायमच हवाहवासा वाटतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.