रितेश रवी नाईकना उमेदवारी
दिल्लीतील भाजपा राष्ट्रीय मुख्यालयातून घोषणा : दामू नाईक यांच्याकडून शुभेच्छा
फोंडा : फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपातर्फे अपेक्षेप्रमाणे रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवार दि. 23 रोजी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रितेश नाईक हे फोंड्याचे दिवंगत आमदार तथा माजी कृषीमंत्री रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. गुऊवारी सकाळी दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयातून रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे कळताच कार्यकर्ते व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. रितेश नाईक, त्यांचे बंधू रॉय नाईक यांच्यासह जवळच्या कार्यकर्त्यांनी खडपाबांध येथील शिवपार्वती मंदिराच्या टेकडीजवळ ज्या ठिकाणी स्व. रवी नाईक यांच्यावर अंत्यस्कार करण्यात आले,
त्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यानंतर कुंडई येथील तपोभूमीवर जाऊन प. पू. ब्रह्मेशानंद स्वामीजींचे आशिर्वादही घेतले. सायंकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी खडपाबांध फोंडा येथील कार्यालयात येऊन रितेश नाईक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार विनय तेंडुलकर, पक्षाचे पदाधिकारी सिद्धार्थ कुंकळ्योकर, सर्वानंद भगत, संजीव देसाई, तसेच मातोश्री पुष्पा रवी नाईक, भाऊ नगरसेवक रॉय नाईक हे उपस्थित होते. पक्षाने आपल्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल आभार व्यक्त करतानाच सर्व कार्यकर्ते व मतदारांच्या पाठिंब्याने वडिल रवी नाईक यांनी फोंड्याच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दळवी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार ?
विश्वनाथ दळवी यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी खडपाबांध येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बराचवेळ चर्चाही झाली. मात्र या चर्चेनंतर दामू नाईक दळवी यांची नाराजी दूर कऊ शकले नाहीत, हे एकंदरीत परिस्थितीवऊन जाणवत होते. उमेदवार रितेश नाईक यांचे अभिनंदन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दामू नाईक यांनी दळवींच्या नाराजीवर भाष्य केले. विश्वनाथ दळवी हे भाजपाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते आहेत. पक्षाची तत्त्वे व ध्येयधोरणे त्यांना पुरेपूर माहीत आहेत. देश आधी नंतर पक्ष आणि त्यानंतर आपण ही पक्षाची तत्त्वप्रणाली त्यांनाही मान्य असेल. या तत्त्वामुळेच भाजपा आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहे. उमेदवारी संदर्भात निर्णय घेताना विविध पातळ्यांवर सर्व्हे केला जातो. या सर्व्हेमुळेच भाजपा विधानसभा, जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी होत आला आहे. भाजपा हा सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याने त्यात अंतर्गत मतभेद, नाराजी, ऊसवे फुगवे असतील. तरीही पक्ष हा आम्ही परिवार मानतो. काहीवेळा परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. दळवी हे आमचे जुने कार्यकर्ते असून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, असे दामू नाईक म्हणाले. ज्या पद्धतीने जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्वांनी जोर लावून कुर्टीची जागा जिंकली होती, त्याची पुनरावृत्ती पोटनिवडणुकीतही होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
समर्थकांचा दळवी यांच्यावर दबाव
खडपाबांध येथे मोठ्या संख्येने जमलेल्या समर्थकांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी दळवी यांच्यावर दबाव टाकला. काहींच्या मते त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, तर काही समर्थकांनी दळवी जो निर्णय घेतील, त्याला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ते उमेदवार अर्ज भरणार असल्याचे सांगितले. मात्र ते अपक्ष उमेदवार म्हणून हा अर्ज भरणार की, एखाद्या पक्षाची उमेदवारी घेणार हे स्पष्ट झालेले नाही.
विश्वनाथ दळवी यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
रितेश नाईक यांना भाजपाची उमेदवारी जाहीर होताच या उमेदवारीसाठी दावेदार असलेले पक्षाचे जुने कार्यकर्ते तथा दक्षिण गोवा सचिव विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. दळवी यांचे समर्थक मोठ्या संख्येने खडपाबांध येथील त्यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले. पक्षाने उमेदवारीसंदर्भात घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र पक्षाच्या या निर्णयाविऊद्ध नाराजी व्यक्त करताना आपली भूमिका अद्याप त्यांनी स्पष्ट केलेली नाही. आपल्याला दुपारीच उमेदवारीसंदर्भात बातमी समजली. त्यावर आपला पुढील निर्णय काय असेल यावर विचार करायला वेळ हवा असल्याचे दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.