अमेरिकेत 18 राज्यांमध्ये हिमवादळाचा धोका तीव्र
आणीबाणी जाहीर, आणखी 9 हजारांहून अधिक उ•ाणे रद्द
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील हिमवादळ आणखीनच तीव्र झाले आहे. 18 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी आणखी 9 हजार विमानोड्डाणे रद्द केल्याने गेल्या दोन दिवसांत 14 हजारांहून अधिक उड्डाणांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार 20 कोटी लोक म्हणजेच जवळजवळ दोन तृतीयांश अमेरिकन नागरिक या वादळाच्या विळख्यात सापडले आहेत. वादळामुळे मुसळधार हिमवर्षाव, पाऊस आणि थंडी येईल असा इशारा देण्यात आला असून परिस्थिती अत्यंत धोकादायक बनणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या अनेक भागात 10 ते 14 इंच बर्फवृष्टीची शक्यता आहे. वादळाच्या भीतीने लोक किराणा दुकानांकडे गर्दी करत आहेत. अनेक दुकानांमध्ये पाणी, अंडी, लोणी आणि मांस संपत आले आहे. वाहतूक अधिक्रायांनी आठवड्याच्या शेवटी प्रवासात विलंब आणि रद्दीकरणाचा इशारा दिला आहे. अनेक प्रमुख शहरांमधील विमानतळांवरही परिणाम झाला आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटअवेअरनुसार, शनिवार ते सोमवार पर्यंत 14,800 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. अमेरिकन एअरलाइन्सच्या 43 टक्के आणि डेल्टा एअरलाइन्सच्या 35 टक्के उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हवामान खात्यानुसार, हे वादळ अमेरिकेच्या उच्च मैदानांपासून सुरू होईल आणि हळूहळू पूर्वेकडे सरकेल. मेम्फिस, नॅशव्हिल, वॉशिंग्टन डीसी, बाल्टिमोर, फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क सारख्या प्रमुख शहरांमध्ये बर्फवृष्टी होईल. दक्षिण रॉकीज आणि मैदानांपासून मध्य-अटलांटिकमधून ईशान्येकडे जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोलोरॅडो ते वेस्ट व्हर्जिनिया आणि बोस्टनपर्यंतच्या अनेक भागात 12 इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टी होऊ शकते. तर न्यूयॉर्क शहराच्या आसपासच्या काही भागात 10 ते 14 इंच बर्फवृष्टी होऊ शकत. तसेच 30 मैल प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. आग्नेय अमेरिकेच्या मोठ्या भागातही गोठवणारे तापमान अनुभवायला मिळेल, असा इशारा देण्यात आला आहे.