चाळीशीत वाढतोय हायपर टेन्शनचा धोका
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, मद्यपान, सिगारेट, तंबाखूचे व्यसन, मीठ-साखरेचे अधिक प्रमाण, अपुरी विश्रांती आदी कारणांमुळे चाळीशीतच हायपर टेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाचा धोका वाढत आहे. देशात सुमारे 30 टक्के प्रौढ हायपरटेन्शनने त्रस्त असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निर्देशानुसार उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोक व मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे याला वैद्यकीय भाषेत ‘सायलेंट किलर’ असेही संबोधले जाते.
उच्च रक्तदाब 140/90 mmHg पेक्षा जास्त रक्तदाब हायपरटेन्शन मानला जातो. चाळीशीनंतर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. कौटुंबिक इतिहास असलेल्यांना धोका जास्त असतो. रक्तदाबाची लक्षणे सहसा दिसत नाहीत, म्हणून याला सायलेंट किलर म्हणतात. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, छातीत दुखणे, दम लागणे, सूज येणे, दृष्टिदोष अशी लक्षणे असल्याचे हृदयविकार तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी सांगितले.
- महिलांमध्ये प्रमाण अधिक
धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, आहारातील बदल यामुळे महिलांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होण्याची भीती असते. बहुतांश महिलांना गर्भावस्थेतील हायपर टेन्शन ही आजकाल सतावणारी समस्या पुढे आली आहे. सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळत असल्याने आई होताना हा आजार टाळण्याची गरज आहे. त्यातूनच प्री-एक्ल्मप्शियाची (गरोदरपणातील अतिरक्तदाब) शक्यता वाढीस लागत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- प्री-एक्ल्मप्शियाची कारणे
गर्भाच्या वारेत किंवा गर्भवेष्टनात पुरेशा रक्तवाहिन्या तयार न होणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे डॉक्टरांनी निरिक्षण केले आहे. बरेचदा पहिल्या गरोदरपणातच प्री-एक्ल्मप्शियाचा त्रास होतो.
- सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांना हायपर टेन्शन
बऱ्याचदा गर्भवती महिलांमध्ये हायपर टेन्शन (रक्तदाब वाढणे) ही समस्या वाढत आहे. सतत गर्भवती महिलामध्ये सततचा तणाव, काळजी हे प्रमुख कारण मानले जाते. बदलत्या जीवनशैलीत सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब समस्या दिसून येत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
- तज्ञांच्या टिप्स :
-नियमित रक्तदाब तपासणी
-कमी मीठ-साखरेचा आहार
-फळे-भाज्यांचा समावेश
-मध्यम व्यायाम (योग, चालणे), तणाव व्यवस्थापन (ध्यान, प्राणायाम)
-धूम्रपान-मद्यपान टाळणे,
-वजन नियंत्रण व 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
-डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा
- असे करा व्यवस्थापन :
नियमित शारीरीक हलचाली, रक्तदाब तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, तणावमुक्तीसह योग व्यायाम
- नियंत्रणासाठी आहार :
स्किमड दुध, पालक भाजी, द्विदल धान्य, सोयाबीन, मीठाचे प्रमाण कमी, हलके अन्न, फळे व पालेंभाज्या. उच्च रक्तदाब ही एक चिंतेचा भाग बनला आहे. मात्र, यावर योग्य आहार व उपचाराने प्रतिबंध करता येऊ शकतो. आहारात तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. उच्च रक्तदाब महिलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
डॉ. अक्षय बाफना, हृदरोग विभाग प्रमुख, सीपीआर