उन्हाच्या वाढत्या झळा: कंपन्यांचा जिव्हाळा
एप्रिल, मे या उन्हाळ्याच्या कालावधीत वाढत्या गरमीपोटी उष्णता व उष्णतेची लाटसदृश्य स्थिती ही नित्याची बाब समजली जाते. यातूनच सर्वजण ‘नेमेची मग येतो उन्हाळा’ असा रखरखीत अनुभव घेत असतात. जागतिक हवामान तज्ञांच्या अभ्यासानुसार 2025 वर्षीचा उन्हाळा जागतिक संदर्भात सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदण्यात आला होता, हे यासंदर्भात उल्लेखनीय असून अशावेळी विविध कंपन्या-कार्यालयांमध्ये विशेषत: प्रवास करणाऱ्या वा कार्यालयाबाहेर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेगळीच कसोटी असते. या उन्हाळी उष्णतेच्या वार्षिक समस्येवर मात करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व व्यवस्थापकदेखील विशेष स्वरुपात प्रयत्न करीत असतात. यंदा पण उन व उन्हाळा भरीला आला असताना याचाच प्रत्यय व परिचय येत आहे.
यासंदर्भात मुळात भर उन्हाळ्यात देशांतर्गत निवडक ठिकाणी असणारे तापमान व त्यातील चढउतार समजून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात यावेळच्या उन्हाळ्याच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील तापमान सरासरी स्वरुपात 40 ते 46 टक्के होते. त्यातही उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटी 47.6 टक्के सेंटीग्रेड एवढ्या तापमानाची नोंद झाली असून आगामी दोन महिन्यांच्या दरम्यान देशातील उन आणि उन्हाळा यांची स्थिती विविध प्रदेशात सर्व साधारणपणे अशाच स्वरुपाची राहील, असा अंदाज केंद्र सरकारच्या हवामान खात्यातील विषय तज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवामानशास्त्र क्षेत्रातील याच जाणकारांनी हवामान-तापमानाच्या संदर्भात प्रभाव करणाऱ्या व प्रचलित अशा ‘एल-निनो’ चा यासंदर्भात विशेष अभ्यास केलेला आहे. या अभ्यासानुसार सर्वसाधारणपणे एल-निनोचा प्रादुर्भाव व प्रभाव उन्हाळ्यात सागरी क्षेत्रातील तापमान मर्यादेबाहेर वाढल्यामुळे होतो. यावर्षी एल-निनोचा पर्यावरणीय प्रभाव अधिक राहण्याचे अनुमान अभ्यासकांनी काढले आहे.
एल-निनोचा प्रभाव व परिणाम वातावरणासह उन्हाच्या तीव्रतेपासून पावसाच्या प्रमाणापर्यंत होत असतो, असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. भारताच्या संदर्भात एल-निनोचा मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम म्हणजे अतिवृष्टी व मोठ्या प्रमाणावरील उष्णतेची लाट अशा दोन्ही प्रकारच्या अतिरेकी स्वरुपात दिसून येतो. यावर्षी पण उर्वरित उन्हाळ्यात सूर्याच्या तापाच्या जोडीलाच उष्णतेच्या लाटांच्या प्रतापाला भारताला सामोरे जावे लागण्याचा अभ्यासपूर्ण इशारा देण्यात आल्याने साऱ्यांच्याच काळजीत स्वाभाविकपणे भर पडली आहे.
यावर्षीच्या उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कंपन्यांनी पुढाकार घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. यासाठी कंपन्यांनी चाकोरीबद्ध प्रयत्न न करता विविध प्रकारे पुढाकार घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. यामध्ये व्यावसायिक गरजा लक्षात घेतानाच कामांच्या प्राथमिकतेमध्ये लवचिकपणे बदल करणे, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कामाची प्रक्रिया व ठिकाणांमध्ये बदल करणे, गर्मीचे स्वरुप लक्षात घेऊन कामाच्या तासांची फेररचना करणे इ. चा समावेश केला आहे. तर केवळ कार्यालयीन स्वरुपाचे व्यावसायिक काम करणाऱ्यांसाठी व्यावसायिक आवश्यकता व कर्मचाऱ्यांच्या गरजांचा समन्वय साधून यापूर्वीच विविध कारणांनी प्रस्थापित आशा धरून काम करण्याची सुलभ मुभा पुन्हा प्रदान केली आहे.
या संदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मर्सिडीज बेंझ, नो डॉट कॉम, सॅव्हिलिस इंडिया यासारख्या कंपन्यांनी तीव्र उन्हापासून कर्मचाऱ्यांना होणारा त्रास कमी व्हावा या दृष्टीने व्यापक प्रमाणावर घरुन काम करण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन दिले असून त्याला कर्मचाऱ्यांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील आघाडीवरील अशा इटर्नल ग्रुप सारख्या कंपन्या भर उन्हाळ्यात भटकंतीसह काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या विक्री केंद्रस्थानी थंड पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय करण्याशिवाय कुलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या कर्मचाऱ्यांना उन्हात फिरतांना सहजपणे उपयोगी पडतील, अशी ग्लुकोजसह पिण्याच्या पाण्याची पाकिटे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या कर्मचारी-कामगारांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार ताक देण्याचा उपक्रम काही बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन कंपन्यांनी सुरु केला आहे. हे विशेष.
कर्मचारी निवड व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या सीआयईएल-एचआर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य मिश्र यांच्यानुसार उन्हाची वाढती तीव्रता व त्यामुळे कर्मचाऱ्यांना होणारा अथवा होऊ शकणारा त्रास लक्षात घेता काही कंपन्यांनी त्यांच्या कामाचे फेरनियोजन करून कंपनीचे काम व्हावे व कर्मचाऱ्यांना उन्हाची झळ बसू नये यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचे निश्चित-निर्धारित व प्रसंगी सोईस्कर लवचिक अशा पद्धतीने नियोजन केले असून हा प्रयोग उभयपक्षी परिणामकारकरित्या फायदेशीर ठरला आहे.
मालाची वाहतूक, ने-आण व प्रत्यक्ष थेट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उन्हामुळे येणारा थकवा व त्रास आटोक्यात आणण्यासाठी विशेषत: ई-कॉमर्ससह लॉजिस्टिक कंपन्यांनी आपल्या विक्री केंद्र, मालवाहतूक करणारी वाहने व भर उन्हात विशेषत: थेट विक्री करणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ केली आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या अंतरामध्ये घट होऊन त्यांचा अप्रत्यक्षपणे उन आणि उन्हाळ्यापासून बचाव होऊ लागला आहे.
उन्हाची ही काहिली जूनपर्यंत सुरु राहणार असल्याच्या भारतीय हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उन्हामुळे होऊ शकणाऱ्या उष्माघात वा तत्सम आजारांवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये संवाद व प्रशिक्षणासह जागृती निर्माण करण्यावर भर दिला आहे. यामध्ये आगामी महिन्यात कर्मचाऱ्यांनी घ्यावयाच्या विशेष काळजीअंतर्गत त्यांचे खानपान, उन्हात फिरतांना व काम करताना घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे. याच्याच जोडीला कर्मचाऱ्यांनी प्रदीर्घ तास काम करू नये, शक्यतो सावलीचा वापर करावा, पेय-पानाच्या वेळा पाळाव्यात इ. बाबींचे कटाक्षाने पालन करण्यात येत असून त्यातून भर उन्हाळ्यात कंपनी व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांप्रती असणारा जिव्हाळाच दिसून येतो.
दत्तात्रय आंबुलकर