For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉक्सिंग खेळातील उभरता तारा..... निखिल गावकर

06:00 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉक्सिंग खेळातील उभरता तारा      निखिल गावकर
Advertisement

बॉक्सिंग या मर्दानी खेळातील गोव्याचा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांतील आलेख आता नेहमीच उंचावलेला दिसत आहे. केवळ उत्तर गोव्यापुरताच बॉक्सिंग खेळ आता मर्यादित राहिला नसून दक्षिण गोव्यातही प्रोफेशनल पद्धतीने या खेळाचा विकास व्हायला लागला आहे. बॉक्सिंग खेळाकडे आता मुलांप्रमाणे मुलींचा सहभाग वाढताना दिसत आहे. विविध वयोगटातील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांत गोव्याच्या बॉक्सिंगपटूंची कामगिरी बहरताना दिसत आहे. गोव्यातील अशाच एक प्रतिभावंत बॉक्सिंगपटूने अल्पवधीतच या खेळात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.

Advertisement

निखिल नरेंद्र नाईक गावकर...... पणजीत आल्तिनोवर राहणाऱ्या या  बॉक्सिंगपटूला योग्य मार्गदर्शन आणि या खेळातील प्रोफेशनल प्रशिक्षण मिळाले तर, भविष्यात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांत गोव्याला तसेच भारताला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पदके मिळायला वेळ लागणार नाही. निखिलचं स्वप्नच तसं आहे. राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त करून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे. राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर निखिलने लक्षवेधक कामगिरी करून भारतातील प्रशिक्षकांचे लक्ष आपल्याकडे आतापर्यंत वेधून घेतलचं आहे. 2022 मध्ये या खेळाकडे वळलेल्या निखिलला त्याच्या जीवलग मित्राने एक दिवस सहज म्हणून पर्वरीतील साल्वादोर-दी-मूंद येथे असलेल्या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात नेले. क्षणातच आपण या बॉक्सिंग खेळाकडे वळलो गेलो. या खेळाचं एक जबरदस्त आकर्षण माझ्यात निर्माण झाले आणि त्याचक्षणी साल्वादोर-दी-मूंद प्रक्षिण केंद्रात प्रशिक्षणार्थी होण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच त्यासाठी मी माझी नावनोंदणीही केली, असे निखिल म्हणाला.

बॉक्सिंग खेळाने माझे जीवन बदलल्याचे या खेळातील लिजंड माईक टायसनला आपला आदर्श मानणारा निखिल म्हणाला. रागावर कसं नियंत्रण ठेवावं आणि शिस्तीसंदर्भात आपणाला या खेळातून खूप काही मिळालं असे निखिल म्हणाला. हा खेळ जरी शारीरिक अपघातांना निमंत्रण देणारा असला तरी बॉक्सिंगमधून शरिरातील सर्व अवयवांना समतोल व्यायाम मिळतो, असे निखिल म्हणाला. साल्वादोर-दी-मूंदच्या प्रशिक्षण केंद्रात गोवा क्रीडा प्राधिकरणाचे बॉक्सिंग खेळातील अनुभवी प्रशिक्षक चितांबरम नाईक यांच्या कुशल प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाखाली सध्या निखिल नाईक सराव करत आहे. निखिलच्या बाबतीत आपला अभिप्राय देताना त्याचे प्रशिक्षक चितांबरम त्याची स्तुती करताना थांबत नाहीत. सप्टेंबर 2022 मध्ये या खेळात आलेल्या निखिलने बॉक्सिंगमध्ये आपली वेगळी छाप पाडली असून या दोन वर्षांतच त्याने राज्यातील कित्येक बॉक्सिंगपटूंविरूद्ध बॉक्सिंग बाऊट्समध्ये आपली कमाल दाखवली आहे. यातील काही बॉक्सिंगपटू गोव्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांत पदक विजेतेही आहेत, असे चितांबरम नाईक म्हणाले.

Advertisement

बॉक्सिंगमध्ये खेळातील बारकावे समजणे हे अतिमहत्वाचे आहे आणि हे निखिलमध्ये आहे. तो एक ‘क्विक अँड फास्ट लर्नर’ आहे तसेच जोखिम घ्यायला तो घाबरत नाही, आणि या दोन्ही गोष्टी प्रोफेशनल बॉक्सिंगपटू बनण्यासाठी अतिमहत्वाच्या आहेत. या दोन्ही बाबीं आम्हाला निखिलच्या स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये दिसतात, असे चितांबरम नाईक म्हणाले. राज्यातील स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये तो अपराजित असून दोन वेळचा राज्य विजेताही आहे. मेघालयात झालेल्या राष्ट्रीय एलिट बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत निखिलने गोव्याचे पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व केले आणि देशातील नामवंत बॉक्सिंगपटूंना बाऊट्समध्ये नमते घेण्यास लावले. पहिल्या प्रयत्नातच उप-उपान्त्यपूर्व फेरी गाठणाऱ्या निखिलला शेवटी पंजाबच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटूकडून पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेत निखिल एखाद्या कसलेल्या व अनेक लढतींचा अनुभव असल्याप्रमाणे खेळला. तिथं उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांनीही निखिलच्या कामगिरीचे प्रशंसा केली.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगचे अधिकारी आणि गोवा बॉक्सिंग संघटनेचे सर्वेसर्वा लॅनी दी गामाही निखिलने बॉक्सिंग खेळात केलेल्या प्रगतीबद्दल त्याचे मुक्त कंठाने प्रशंसा करतात. निखिल हा ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे ते सांगतात. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू बनण्याची प्रतिभा निखिलमध्ये आहे. त्याचे लांब हात हा त्याचा ‘प्लस पॉईंट’ आहे. एलिट बॉक्सिंग स्पर्धेत सलग दोन वेळा सुवर्णपदक आणि त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी, याच्यापेक्षा कुठल्याही बॉक्सिंगपटूसाठी एवढी चांगली सुरूवात असू शकत नाही, असे कित्येक वेळा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांत तांत्रिक अधिकारी म्हणून काम केलेले लॅनी दी गामा म्हणतात. निखिलचा सध्या नियमित सरावावर भर आहे. येत्या जानेवारी होणाऱ्या एलिट पुरूष राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा तसेच उत्तराखंडात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी निखिल करत आहे. भविष्यात निखिलकडून गोव्यालाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतही पदकांची निश्चितच अपेक्षा करता येते..

संदीप मो. रेडकर

Advertisement
Tags :

.