शहरी भागातून रानभाज्यांच्या मागणीत वाढ
कोल्हापूर :
श्रावण महिना आला की शहरी भागात डोंगरकपारीत उगवलेल्या रानभाज्यांना विशेष मागणी असते. इतरवेळी बाजारपेठापासून या भाज्या दूर असतात. पण यातील औषधी गुणधर्मामुळे या भाज्यांना मागणी वाढत आहे.
पावसाळा सुरू झाला की राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा अशा डोंगर भागातून रानभाज्या मोठ्या प्रमाणात शहराकडे विक्रीसाठी येतात. चवीला जरी कडवट असल्या तरी त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणामुळे या भाज्यांना शहरात खूप मागणी आहे. या भाज्या नैसर्गिक पद्वतीने डोंगरात वाढलेल्या असतात. कोणत्याही रासायनिक घटकांचा त्यांच्या वाढीसाठी वापर केलेला नसतो. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत उपयोगी असणाऱ्या या भाज्यांची मागणी दिवसेंदिवस शहरात वाढत असल्याचे चित्र आहे. भाजी मार्केटमध्ये या भाज्या विकायला येणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे.
- या रानभाज्यांना आहे मागणी
सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये प्रामुख्याने वेलवर्गीय आणि कंदवर्गीय भाज्या पहायला मिळतात. यामध्ये काटेमाठ, रानभेंडी, तेरडा, फांगुळ, शेवळा, भोकर, पातरी, टाकळा, कुर्डू, आघाडा, केना, कुलू, रानपोकळा, कपालफोडी, मांजरी, घोटोळी, भारंगी आदी भाज्यांचा समावेश होतो.
- रानभाज्यांविषयी प्रबोधन गरजेचे
आपल्या भागात अशा अनेक रानभाज्या आहेत. ज्यांचे अन्यनसाधारण औषधी गुणधर्म आपल्याला पहायला मिळतात. मात्र हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे या भाज्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आजच्या नवीन पिढीला या भाज्यांविषयी माहिती देण्यासाठी पालकांनीही प्रबोधन करणे गरजेचे आहे.
- अनिल चौगले, कार्यवाह, निसर्गमित्र परिवार.
- रानभाज्यांची यंदा लवकर उगवण
यंदा मे महिन्यातच पावसाने स़ुऊवात केली. त्यामुळे या भाज्या लवकर डोंगरकपारीत उगवल्या आहेत. या भाज्यांमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे आम्ही या भाज्यांचे नेहमी सेवन करतो.
- विवेक कुलकर्णी, शेतकरी, पुंगाव
- शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन अत्यावश्यक
रानभाज्या जरी चवीला कडवट असल्या तरी त्यांच्यामध्ये पोषणमूल्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यांच्यो असणारड सुक्ष्म पोषणमुल्ये शरीरातील ऊर्जा टिकवण्यासाठी मदत करतात आणि शरीरातील आजांराविरोधात लढण्यासाठी शक्ती निर्माण करतात. झिंक, आयर्न असे शरीराच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक घटक या रानभाज्यांमध्ये असल्याने शहरी भागात या भाज्यांना चांगली मागणी आहे.
- डॉ. श्रुती भोला, आहारतज्ञ, सेवा रुग्णालय कसबा बावडा