प. आशियातील तणावामुळे ईव्हीची वाढती मागणी
जेएसडब्लूच्या एमजी मोटारला मोठा लाभ होणार असल्याचा कंपनीचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पश्चिम आशियातील तणावानंतर ईव्हीची मागणी वाढली, जेएसडब्ल्यू एमजी मोटरला मोठा फायदा होणार असल्याचा दावा व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे म्हणणे आहे की, पश्चिम आशियातील तणावामुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक आणि इतर नवीन ऊर्जा वाहनांकडे (ईव्ही) वाढला आहे आणि कंपनीला अपेक्षा आहे की यावर्षी तिच्या एकूण विक्रीपैकी 70 ते 80 टक्के विक्री अशा ईव्हीमधून होणार असल्याचेही म्हटले आहे. पश्चिम आशियातील तणावाचा भारतीय वाहन क्षेत्रावर परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या आणि इंधनाच्या किमतींबाबतच्या अनिश्चिततेचा परिणाम भारतीय वाहन बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, जेएसडब्ल्यू एमजी मोटरसह अन्य वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्याही आपल्या ईव्ही उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान या बदलामुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक आणि इतर नवीन ऊर्जा वाहनांकडे वाढला असल्याचेही नमूद केले आहे.
तणावाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीचे आकर्षण
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी म्हटले आहे की, मार्चनंतर पश्चिम आशियातील संकट अधिक गडद झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. ते म्हणाले की, पूर्वी प्रवासी वाहन बाजारात जानेवारीमध्ये ईव्हीचा (इलेक्ट्रिक वाहनांचा) वाटा सुमारे 3.8 टक्के होता, तर जूनपर्यंत तो 8 टक्क्यांहून अधिक वाढला. यावरून हे स्पष्ट होते की, आता ग्राहक नवीन कार खरेदी करताना इलेक्ट्रिक आणि इतर नवीन ऊर्जा वाहनांना प्राधान्य देत आहेत.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांच्या मते, वाढत्या ईव्हीच्या मागणीचा थेट फायदा जेएसडब्ल्यू एमजी मोटरलाही होत आहे. कंपनी सध्या आपल्या प्लांटमध्ये तीन शिफ्टमध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन करत आहे. त्याच वेळी, कंपनीने यावर्षी आतापर्यंत सुमारे 40,000 वाहने विकली आहेत, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 12 ते 13 टक्क्यांनी जास्त आहे.
नवीन वाहने सादर करण्याची तयारी
जेएसडब्ल्यू एमजी मोटरने अलीकडेच एडीएपीटी (अॅडव्हान्स ड्राईव्ह आर्किटेक्चर प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी) नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म सादर केला आहे. कंपनी लवकरच या प्लॅटफॉर्मवर एक नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. या वर्षी एक प्लग-इन हायब्रीड मॉडेल देखील सादर केले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की, हा प्लॅटफॉर्म ईव्ही, हायब्रीड, प्लग-इन हायब्रीड आणि रेंज एक्स्टेंडर इलेक्ट्रिक व्हेइकल यांसारख्या विविध प्रकारच्या पॉवरट्रेनला सपोर्ट करतो.