वाढती गुन्हेगारी त्यात ‘खाकी’चीही ‘कर्तबगारी!’
वर्दीच्या आडून डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई होणार का? मटका-जुगारी अड्ड्यांवरील छापे किती खरे? गृहमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी आवश्यक
बेळगाव : बेळगावसह कर्नाटकात गुन्हेगारी प्रकरणात अधिकारी व पोलिसांचा सहभाग वाढत चालला आहे. जनतेचे रक्षकच भक्षक बनल्याच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळेच की काय, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेल्या अधिकारी व पोलिसांची दलातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला आहे. या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. कर्नाटकातील काही घटना लक्षात घेता चोऱ्या, दरोडे प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळून आला आहे. याच महिन्यात राजधानी बेंगळूर व दावणगेरी येथे घडलेल्या दोन घटनांनी एकच खळबळ माजली आहे. सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच गुन्हेगारी प्रकरणात अडकू लागले आहेत.
19 नोव्हेंबर रोजी कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे एक मोठा दरोडा पडला. एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी रक्कम घेऊन जाणारे सीएमएस कंपनीचे वाहन अडवून सशस्त्र दरोडेखोरांच्या एका टोळीने 7 कोटी 11 लाख रुपये पळविले. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे राज्य सरकारवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. राजधानीत भरदिवसा दरोडे घातले जात आहेत. आम्ही सुरक्षित आहोत का? असा प्रश्न उपस्थित करीत राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळल्याचा आरोप करण्यात आला. बेंगळूर पोलिसांनी केवळ दोन दिवसात सात जणांच्या टोळीला अटक करून 6 कोटी 29 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तब्बल 200 अधिकारी व पोलिसांचा वापर करण्यात आला.
या प्रकरणाचा मास्टरमाईंड बेंगळूर येथील गोविंदपूर पोलीस ठाण्यातील आण्णाप्पा नायक हा पोलीस असल्याचे तपासात उघडकीस आले. आण्णाप्पासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. दरोडा कसा घालायचा, दरोड्यानंतर पलायनासाठी खोट्या नंबरप्लेटच्या वाहनांचा वापर कसा करायचा? तपास यंत्रणेला चकवण्यासाठी मोबाईलला पर्याय म्हणून इतर अॅपचा वापर कसा करायचा? आदी मार्गदर्शन दरोडेखोरांना या पोलिसाने केले होते. प्रत्यक्ष दरोड्यातही त्याचा सहभाग होता. या घटनेनंतर 23 नोव्हेंबर रोजी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावून गुन्हेगारी प्रकरणात अधिकारी व पोलिसांचा सहभाग आढळून आल्यास त्यांची हकालपट्टी करा, अशी सूचना केली आहे. गेल्या आठवड्यात गृहमंत्री बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
दावणगेरी येथे 23 नोव्हेंबर रोजी आणखी एक घटना घडली. कारवार येथील विश्वनाथ अर्कसाली हा सुवर्ण कारागिर दावणगेरीत आला होता. वेगवेगळ्या सराफांना भेटून दागिने बनवण्यासाठी त्याने 78.15 ग्रॅम सोने घेऊन तो गावी चालला होता. रात्री त्याला बसमधून खाली उतरवून ‘तू सोन्याची तस्करी करतोस का?’ अशी विचारणा करीत त्याला मारहाण करून त्याच्याजवळील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी दावणगेरी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांमध्ये दोन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. हावेरी जिल्ह्यातील हंसभावीचा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक माळाप्पा चिप्पलकट्टी व सागरचा पोलीस उपनिरीक्षक प्रवीणकुमार या दोघा जणांनी सुवर्ण कारागिराला मारहाण करून सोने पळविल्याचे उघडकीस आले आहे. माळाप्पाची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर प्रवीणकुमारवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संपूर्ण व्यवस्थाच संशयाच्या भोवऱ्यात
या दोन ताज्या घटनांवरून पोलीस दलातील काही जणांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे संपूर्ण व्यवस्थाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बेळगाव जिल्ह्यातही यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी पोलीस दलातील गुन्हेगारीकरणावर दाखवलेला आक्रमकपणा त्यावेळच्या प्रशासनाने दाखवला असता तर अनेक अधिकारी व पोलिसांनी घरचा रस्ता धरला असता. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्यासाठीच अधिक प्रयत्न झाले.
9 जानेवारी 2021 रोजी हत्तरगी टोलनाक्याजवळ एक अर्टिगा कार अडवण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ही कार यमकनमर्डी पोलीस स्थानकात नेऊन अल्ट्ररेशन केल्याप्रकरणी कारमालकावर कारवाई करण्यात आली. प्रत्यक्षात या कारमध्ये 4 किलो 900 ग्रॅम सोने होते. मंगळूर येथील टिळक पुजारी या सराफी व्यावसायिकासंबंधीचे ते सोने होते. कारमध्ये एअरबॅगसाठी जेथे जागा असते त्या जागेत दागिने लपवून ठेवण्यात आले होते. पोलीस स्थानकासमोर उभी करण्यात आलेल्या कारमधून हे दागिने चोरण्यात आले होते.
26 मे 2021 रोजी यासंबंधी एफआयआर दाखल झाला. यमकनमर्डी, संकेश्वर व हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात टप्प्याटप्प्याने तीन एफआयआर दाखल करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले. सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले. बेळगाव उत्तर विभागाचे तत्कालिन पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, गोकाकचे तत्कालिन पोलीस उपअधीक्षक जावेद इनामदार यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांना सीआयडीने नोटिसा दिल्या. अधिकाऱ्यांची चौकशी झाली. मध्यस्थाची भूमिका वठवलेल्या हुबळीच्या किरण नामक एका युवकाला अटक झाली. चार वर्षांनंतरही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाही.
कारमधून चोरलेल्या सोन्याची हुबळी येथील सराफाला विक्री केल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्यामुळे सीआयडीला दागिने मिळू नयेत, याची काळजी घेण्यात आली. शेवटी काही अधिकाऱ्यांची नार्को चाचणी करण्याचा निर्णयही सीआयडीने घेतला. या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी नार्को चाचणीसाठी नकार दिला. हे प्रकरण अद्याप अनिर्णित आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. त्यावेळचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी या अधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका वठवली. निष्ठूरपणे व ठामपणे त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला नसता तर इतर प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणही खपून गेले असते.
त्यांच्यावर कोणती कारवाई करणार?
सध्याचे माहिती खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर हे बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख पदावर असताना काकतीजवळ चांदी घेऊन जाणारे वाहन अडवून त्यावर दरोडा घालण्यात आला. काकतीचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक व काही पोलिसांचा या प्रकरणात सहभाग होता. हेमंत निंबाळकर यांनी एफआयआर दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतरही पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक दरोडे पडले आहेत. कर चुकविण्यासाठी कारमधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करणाऱ्या सराफी व्यावसायिकांना लक्ष्य बनवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची एक टोळीच बेळगावात कार्यरत होती. हुबळी-धारवाड परिसरातही अशा घटना घडल्या आहेत. हत्तरगी टोलनाक्यापासून हिरेबागेवाडी टोलनाक्यापर्यंत वर्दीतील दरोडेखोरांनी आपल्या तुंबड्या भरून घेतल्या आहेत. आता वेगळ्या मार्गाने दरोड्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मटका, जुगारी अड्डेचालकांना अक्षरश: दरोडेखोरांप्रमाणेच लुटले जात आहे. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? असा सवाल विचारला जात आहे.