वेटलिफ्टिंगमध्ये ऋषिकांत सिंगला रौप्यपदक
जिम्नॅस्टिकमध्ये प्रतिष्ठा सामंत अंतिम फेरीत, सांघिक विभागात घसरण
वृत्तसंस्था, ग्लास्गो
2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टरमध्ये मीराबाई चानूने सुवर्णपदक मिळविले. पुरुष विभागात ऋषिकांत सिंगने भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकले. पुरुषांच्या 60 किलो वजनी गटातील 11 स्पर्धकांमध्ये 28 वर्षीय ऋषिकांत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि या कामगिरीमुळे भारताला स्पर्धेच्या 23 व्या आवृत्तीतील दुसरे पदक मिळाले. या आधी, पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारने पुरुषांच्या हेवीवेट गटात कांस्य पदक जिंकले होते.
‘स्नॅच‘ प्रकारात ऋषिकांतने 116 किलो वजन उचलून सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत इतर स्पर्धकांवर आघाडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात ऋषिकांतने 119 तर तिसऱ्या प्रयत्नात 121 किलो वजन उचलले. 121 किलो वजन उचलल्यामुळे ऋषिकांतने ‘स्नॅच’ प्रकारात वैयक्तिक तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा विक्रमही नोंदवला. ‘क्लीन अँड जर्क’ विभागात ऋषिकांतने पहिल्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्याला 148 किलो वजन उचलण्यात अपयश आले, ज्यामुळे मलेशियाच्या खेळाडूसाठी अव्वल स्थान पक्के करण्याचा मार्ग मोकळा झाला. अनिकने दुसऱ्या प्रयत्नात 149 किलो वजन उचलले. सुवर्ण पदक जिंकण्याची संधी मिळवण्यासाठी ऋषिकांतला त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 151 किलो वजन उचलणे आवश्यक होते. मात्र, ऋषिकांतला 151 किलो वजन उचलण्यात अपयश आले आणि त्यामुळे पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात त्याने रौप्यपदक जिंकत दुसरे स्थान मिळवले. ऋषिकांतची एकूण कामगिरी 264 किलोची होती तर त्याच्या मलेशियन प्रतिस्पर्ध्याने 273 किलो वजन उचलले.
जिम्नॅस्टिक्समध्ये प्रतिष्ठा सामंत ‘व्हॉल्ट‘च्या अंतिम फेरीत दाखल
जागतिक मंचावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत, भारतीय जिम्नॅस्ट प्रतिष्ठा सामंत हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ‘व्हॉल्ट‘ प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवून देशाचा गौरव वाढवला. पश्चिम बंगालच्या या 22 वर्षीय खेळाडूने आपल्या दोन ‘व्हॉल्ट‘ प्रयत्नांत एकूण 13.025 गुण मिळवून अंतिम फेरीतील पहिल्या आठ स्पर्धकांमध्ये आपले स्थान पक्के केले.
भारतीय महिलांच्या सांघिक जिम्नॅस्टिक्सम्ये निराशा
जिम्नॅस्टीकच्या महिलांच्या सांघिक प्रकारात भारताने 123 गुणांसह नववे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाने 158.400 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर कॅनडा (157.300) आणि इंग्लंड (154.300) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. ‘सब-डिव्हिजन 3’मधील चार फेऱ्या (रोटेशन्स) पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ पाचव्या स्थानावर होता, परंतु उर्वरित सब-डिव्हिजनच्या स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ नवव्या स्थानावर घसरला.
तपन मोहंती 15 व्या स्थानावर
पुरुषांच्या जिम्नॅस्टीकच्या ‘ऑल-राऊंड‘ अंतिम फेरीत भारताच्या तपन मोहंतीने 15 वे स्थान मिळवले. सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या स्कॉटलंडच्या रुबेन वॉर्डने सुवर्णपदक जिंकले, तर कॅनडाच्या फेलिक्स डॉल्सीने रौप्य आणि ऑस्ट्रेलियाच्या जेसी मूरने कांस्यपदक पटकावले.
गॅब्रिएलची पकड सुटली, जमिनीवर डोक्यावर कोसळला
पुरुषांच्या सांघिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम फेरीत, इंग्लंडचा जिम्नॅस्ट गॅब्रिएल लँग्टन खाली पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. इंग्लंडच्या गॅब्रिएल लँग्टन अंतिम फेरीतील सादरीकरणादरम्यान हॉरिझॉन्टल बारवरील त्याची पकड सुटली आणि तो थेट जमिनीवर डोक्यावर कोसळला.
या घटनेनंतर वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेतल्याने स्पर्धा काही काळ थांबवावी लागली.
भारताचे लक्ष आज अॅथलेटिक्स इव्हेंट्सवर
सर्वेश कुशारे, तेजस्विन शंकर आणि जे. आदर्श राम (उंच उडी), सीमा पुनिया आणि निधी राणी - महिला थाळीफेक (पात्रता फेरी);
मनप्रीत कौर - महिला गोळाफेक (पात्रता फेरी); विशाल कयालविझी आणि राजेश रमेश - पुरुष 400 मीटर (पहिली फेरी); रशदीप कौर, नीरू पाठक आणि अन्सा बाबू - महिला 400 मीटर (पहिली फेरी); गुलवीर सिंग - पुरुष 10,000 मीटर (अंतिम फेरी); तेज शिर्से - पुरुष 110 मीटर अडथळ्यांची शर्यत (अंतिम फेरी).