For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनच्या राजापेक्षा ऋषी सुनक अन् अक्षता मूर्ती धनवान

06:34 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनच्या राजापेक्षा ऋषी सुनक अन् अक्षता मूर्ती धनवान
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत मागील एक वर्षात मोठी भर पडली आहे. या दांपत्याच्या संपत्तीत एका वर्षात 12 कोटी पाउंडची भर पडली आहे. त्यांची संयुक्त संपत्ती 65.1 कोटी पाउंडवर (6867 कोटी रुपये) पोहोचली आहे. मागील वर्षी त्यांची संयुक्त संपत्ती 52.9 कोटी पाउंड इतकी होती. अशाप्रकारे ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्यापेक्षाही श्रीमंत ठरले आहेत.

किंग चार्ल्स यांच्या संपत्तीत मागील एक वर्षादरम्यान एक कोटी पाउंडची भर पडली. संपत्तीचे एकूण मूल्य 61 कोटी पाउंडवर पोहोचले आहे. अक्षता मूर्ती या भारतातील आयटी कंपनी  इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. मूर्ती यांच्या संपत्तीतील वृद्धीचे मोठे कारण इन्फोसिसमधील त्यांची हिस्सेदारी आहे. एका वर्षात कंपनीतील त्यांच्या हिस्सेदारीचे मूल्य 108.8 दशलक्ष पाउंडच्या वृद्धीसह सुमारे 59 कोटी पाउंडवर पोहोचले आहे. परंतु 2022 च्या तुलनेत ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत घट झाली आहे. तेव्हा या दांपत्याच्या संपत्तीचे मूल्य 73 कोटी पाउंडवर पोहोचले होते.

Advertisement

ब्रिटनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत सलग तिसऱ्या वर्षी घसरण झाली आहे. 2022 मध्ये ही संख्या 177 होती, आता हा आकडा 165 वर आला आहे. या देशातील अनेक उद्योजगांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. तसेच काही ग्लोबल सुपररिच लोक आता ब्रिटनऐवजी अन्य देशांची निवड करत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

नव्या आकडेवारीनुसार ब्रिटनमधील 350 सर्वात श्रीमंत लोक आणि परिवारांची संयुक्त संपत्ती सुमारे 795.36 अब्ज पाउंड मूल्याची आहे. या यादीत पहिल्या स्थानावर गोपी हिंदुजा आणि त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या संपत्तीचे मूल्य आता 37.2 अब्ज पाउंड इतके झाले आहे.

देशातील सर्व अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झालेली नाही. अनेक लोकांच्या संपत्ती मूल्यात घट झाली आहे. मॅन्चेस्टरचे गुंतवणूकदार आणि इनेसोसचे संस्थापक सर जिम रेटक्लिफ यांच्या संपत्तीमूल्यात 6 अब्ज पाउंडची घसरण झाली आहे. आता त्यांच्या संपत्तीचे मूल्य 23.52 अब्ज पाउंड राहिले आहे. अशाचप्रकारे सर जेम्स डायसन यांची संपत्ती आता 20.8 अब्ज पाउंड मूल्याची राहिली आहे. सर रिचर्ड ब्रेनसन यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे. त्यांची कंपनी वर्जिन गॅलेक्टिकला मागील वर्षी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते.

Advertisement
Tags :

.