सम्राट कृष्णदेवराय.. भूमिकेत ऋषम शेट्टी
आशुतोष गोवारिकर करणार दिग्दर्शन
‘कांतारा’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकलेला ऋषम शेट्टी आता एका नव्या चित्रपटात दिसून येणार आहे. बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांच्यासोबत तो काम करणार आहे. त्याचा हा चित्रपट व्यापक स्तरावर निर्माण केला जाणार आहे.
आशुतोष गोवारिकर आणि ऋषभ हे विजयनगर सम्राट कृष्णदेवराय यांच्यावर चित्रपट निर्माण करणार आहेत. या चित्रपटाद्वारे सम्राट कृष्णदेवराय यांच्या जीवनाची झलक मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी करणार आहेत. आशुतोष यांना लगान, स्वदेश आणि जोधा अकबर यासारख्या क्लासिक चित्रपटांसाठी ओळखले जाते. याचबरोबर मोहनजोदडो आणि पानिपत या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. तर श्री कृष्णदेवराय यांच्यावरील चित्रपटात अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड कलाकार दिसून येणार आहेत. ऋषभचा कांतारा 2 हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे. याचबरोबर तो ‘जय हनुमान’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे.