‘रेंट अ कॅब’ आणि ‘रेंट अ बाईक’च्या अपघातात वाढ
गेल्या पाच वर्षांत 222 नागरिकांचा मृत्यू : अपघात करुन पर्यटक होतात पसार
पणजी : ‘रेंट अ कॅब’ आणि ‘रेंट अ बाईक’ यांच्यामुळे गोव्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ रेंट अ कॅबच्या अपघातांमध्ये 222 जण मरण पावले आहे. तथापि गृहमंत्रालय याबाबत गंभीर नसल्याने संबंधित गुन्हेगारांविऊद्ध कारवाई होत नाही. वाहतूक खात्याने गेल्या दोन वर्षांपासून या वाहनांना नव्याने परमिट देणे बंद केले आहे. आता वाहतूक खात्यावर ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार दबाव येत आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रेंट अ कॅबमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतूक खात्याला केवळ परवाने देणे किंवा ते रद्द करणे फार तर वाहतूक परवाने जप्त करणे, तेवढेच काम शिल्लक राहते. प्रत्यक्षात राज्याच्या गृह मंत्रालयाने ही प्रकरणे गांभीर्याने अद्याप घेतलेली नाहीत. त्यामुळे अपघातप्रकरणे तात्पुरती मिटविली जातात. ज्याचे वाहन आहे ते वाहन मात्र जप्त करून ठेवले जाते. प्रत्यक्षात ज्याने वाहन चालविलेले आहे, ते आरामात सुटून आपापल्या राज्यात परत जातात. तोपर्यंत येथील निरपराध व्यक्तींचे प्राणही गेलेले असतात. मात्र संबंधितांविरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतरही पोलिस खाते कारवाई करीत नाही.
अपघात करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
गोवा सरकारने फार गांभीर्याने संबंधीत अपराधांच्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे. वाहतूक खात्याने अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळविल्यानंतर देखील सरकारने कोणतीही कारवाई गांभीर्याने सुरू केली नसल्याने हे अपघात कमी होण्याचे नाव घेत नाही.अपघात करणाऱ्या चालकांवर कारवाई होत नाही आणि ते सुटून जातात. हे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. वाहतूक खात्याने गेल्या दोन वर्षांपासून नव्याने रेंट अ बाईक आणि रेंट अ कॅबला नव्याने परवानगी देण्याचे बंद केले आहे.
नियमांत बदल करण्याची गरज
बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने रेंट अ बाईक व रेंट अ कॅब योजना पुन्हा खुली करावी, यासाठी सरकारतर्फे वाहतूक खात्यावर दबाव येत आहे. मात्र एकेका व्यक्तीने गोव्यात 25 ते 30 दुचाकी वाहने घेतलेली आहेत. काहीजणांच्या नावावर दहा चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे बेरोजगार युवकांना अशा व्यवसायातून रोजगार मिळेल, असे वाटत नाही. त्याचबरोबर जोपर्यंत गोवा सरकार आपल्या नियमात बदल करत नाही तोपर्यंत अपघात करून पर्यटक गोव्यातून पसार होण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
बळी जाणाऱ्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही
रेंट अ कॅब आणि रेंट अ बाईकच्या अपघातांच्या जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये काही वाहनचालक पोलिसांना काहीतरी चिरीमिरी देतात आणि प्रकरणे मिटविण्यास भाग पाडतात, मात्र ज्यांचे प्राण जातात त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही. ज्यांनी वाहने दिलेली असतात त्या वाहन मालकांची वाहने मात्र मोठ्या प्रमाणात जप्त करून ठेवलेली आहेत. अपघात करणारे पर्यटक पसार झालेले असतात. असा विचित्र प्रकार गोव्यात घडत असल्यामुळे रेंट अ कॅब अपघातांची संख्या कमी होत नाही.