रिपुदमन सिंहच्या मारेकऱ्याला जन्मठेप
एअर इंडिया विमान स्फोटाचा आरोपी होता रिपुदमन
वृत्तसंस्था/ ओटावा
एअर इंडियाच्या विमानात 1985 साली बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त ठरलेल्या रिपुदमन सिंह मलिकची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी टॅनर फॉक्सला कॅनडाच्या न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 24 वर्षांच्या फॉक्सला या जन्मठेपेदरम्यान 20 वर्षांपर्यंत पॅरोल न देण्याचाही निर्देश दिला आहे.
कॅनडात एका सुपारी किलरला मंगळवारी 1985 च्या एअर इंडिया विमानातील स्फोटांप्रकरणी निर्दोष मुक्त केलेल्या संशयिताच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. या स्फोटात 331 जणांचा मृत्यू झाला होता. टॅनर फॉक्सला रिपुदमन सिंह मलिकच्या हत्येप्रकरणी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. रिपुदमनची जुलै 2022 मध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. टॅनर फॉक्स आणि त्याचा सहकारी जोस लोपेझने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मलिकच्या हत्येचा गुन्हा कबूल केला होता.
कॅनडाच्या व्हँकूव्हरमध्ये मलिकच्या हत्येसाठी पैसे देण्यात आले होते असे त्यांनी सांगितले होते. परंतु पैसे कुणी दिले हे सांगणे टाळले होते. लोपेझला 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
1985 मध्ये विमानात स्फोट
23 जून 1985 रोजी टोरंटो येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात स्फोट झाला होता. या घटनेत 329 जण मृत्युमुखी पडले होते. हे विमान बोइंग 747-237 बी प्रकारातील होते, ज्याची नोंदणी कनिष्क नावाने करण्यात आली होती. विमानातून प्रवास करणारे बहुतांश जण कॅनडाचे नागरिक होते, जे भारतीय वंशाचे होते. विमानातील स्फोट खलिस्तानी दहशतवाद्यांकडून घडवून आणले होते. याप्रकरणी तलविंदर सिंह परमार आणि इंद्रजीत सिंह रेयात यांना अटक करण्यात आली होती. परंतु पुराव्यांअभावी दोघांचीही मुक्तता करण्यात आली होती. तर रिपुदमन सिंह मलिक अन् अजायब सिंह बागरीला 2000 साली अटक झाली, परंतु 2005 मध्ये त्यांचीही पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली होती.