आयर्लंडमध्ये भडकली दंगल
शाळेसमोर मुलांसमवेत 5 जणांवर चाकूने हल्ले : दंगलखोरांकडून जाळपोळ
वृत्तसंस्था/ डबलिन
आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये एका शाळेबाहेर 5 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका 5 वर्षीय मुलासमवेत महिला गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्यानंतर डबलिनमध्ये दंगली भडकल्या आहेत.
आयर्लंड पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही एक दहशतवादी घटना असू शकते असा पोलिसांना संशय आहे. चाकू हल्ल्यानंतर पारनेशल स्क्वेअर येथे लोकांनी एकत्र येत स्थलांतरितांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर निदर्शक पोलिसांना भिडले आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनांना पेटवून दिले आहे.
शहरात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ आणि चोरीच्या घटना घडल्या आहेत. झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. शहरात होत असलेल्या हिंसेमागे उजव्या विचारसरणीच्या गटाचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
काही निदर्शकांनी ‘आयरिश लाइव्ह्ज मॅटर’ असे नमूद असलेले फलक स्थलांतरित समुदायानजीक झळकविले आहेत. डबलिनमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा रोखण्यात आली असून पूर्ण शहरात 400 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. चाकू हल्ल्यात स्थलांतरितांचा हात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हिंसेदरम्यान दोन जणांना ताब्यात घेतले आहे.