पोटनिवडणूक निकालानंतर बंडाळ्या आणि कागाळ्या
कोणत्याही पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाला अनुकूल असे वातावरण असते. कर्नाटकातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसला फारसे अनुकूल ठरेल असे वातावरण नव्हते. काँग्रेसच्या गॅरंटी योजना व भाजपमधील अंतर्गत बंडाळीमुळे तिन्ही जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. पक्षांतर्गत बंडाळीमुळे पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला, याचा हायकमांडला विचार करावा लागणार आहे. प्रथमच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व विजयेंद्र यांनी तोंड उघडले आहे. या स्वतंत्र आंदोलनाविरुद्ध हायकमांडकडे तक्रार करण्यात आली आहे.
कर्नाटकातील शिग्गाव, संडूर, चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाने प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप व निजद मित्रपक्षाला धक्का बसला आहे. वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोपात गुंतलेल्या सरकारला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायचे होते. तर विरोधी पक्षांना सरकार कमकुवत करण्यासाठी या जागांवर विजय मिळवायचा होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसेल असे निकाल आले होते. त्यानंतर मुडा भूखंड घोटाळा, महर्षी वाल्मिकी निगममधील भ्रष्टाचार, वक्फ बोर्ड प्रकरण, अबकारी विभागातील भ्रष्टाचार आदी प्रकरणांमुळे काँग्रेस पुरती अडचणीत आली होती. हीच प्रकरणे पुढे ठेवून विरोधी पक्षांनी काँग्रेसला घेरले होते. पोटनिवडणुकीत तिन्ही जागांवर झेंडा फडकवण्याचा विश्वास विरोधी पक्षांना वाटत होता. मतदारांनी त्यांचा हा विश्वास खोटा ठरवला.
कोणत्याही पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाला अनुकूल असे वातावरण असते. कर्नाटकातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसला फारसे अनुकूल ठरेल असे वातावरण नव्हते. काँग्रेसच्या गॅरंटी योजना व भाजपमधील अंतर्गत बंडाळीमुळे तिन्ही जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. शिग्गावमध्ये माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे चिरंजीव भरत बोम्माई, चन्नपट्टणमध्ये केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल कुमारस्वामी हे पराभूत झाले आहेत. निखिलच्या वाट्याला तर तिसऱ्यांदा पराभव आला आहे. मध्यंतरी ‘कुरुक्षेत्र’ नामक एक सिनेमा आला होता. महाभारतावर आधारित या सिनेमात निखिल कुमारस्वामी यांनी अभिमन्यूचे पात्र साकारले होते. या निवडणुकीत निखिल अभिमन्यू नाही तर अर्जुन ठरणार, असे कुमारस्वामी जाहीरपणे सांगत होते. मात्र, शेवटी डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी तयार केलेल्या चक्रव्युहात निखिल पुरते अडकले आहेत. या निवडणूक निकालामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे मनोबल वाढले आहे.
डी. के. सुरेश यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा शिवकुमार यांना सूड उगवायचा होता. तो त्यांनी उगवला आहे. चन्नपट्टणमध्ये सी. पी. योगेश्वर विजयी झाले आहेत. या निवडणुकीआधी ते भाजपमध्ये होते. युतीचा उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी मागितली होती. कुमारस्वामी यांनी आपल्या मुलाला उमेदवारीसाठी हट्ट धरला, त्यामुळे योगेश्वर भाजपला राम राम ठोकून काँग्रेसमध्ये गेले. त्यांचा हा राजकीय निर्णय शिवकुमार यांच्या पथ्यावर पडला. रामनगर जिल्ह्यात एच. डी. देवेगौडा व त्यांच्या कुटुंबीयांचे राजकारण संपुष्टात आणण्याचा चंग बांधलेल्या शिवकुमार यांना योगेश्वर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे बळ मिळाले. बहुतेक भाजप नेत्यांचे म्हणणे योगेश्वर यांना उमेदवारी द्या, असेच होते. युतीचा धर्म पालन करण्यासाठी भाजप नेत्यांनी यासाठी आग्रह धरला नाही. निखिल कुमारस्वामी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वत: एच. डी. देवेगौडा, कुमारस्वामी आदी नेत्यांनी प्रचार करूनही निखिल यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेसचे आमदार झाल्यानंतर सी. पी. योगेश्वर यांनी तर जर आपल्या नेत्यांनी आपल्यावर जबाबदारी सोपविली तर निजदच्या सर्व आमदारांना काँग्रेसमध्ये आणू, असे जाहीर केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने भाजप-निजद युतीमध्ये खळबळ माजली आहे. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सी. पी. योगेश्वर यांची भूमिका महत्त्वाची होती. आपल्याला निजद संपवायला वेळ लागणार नाही, असे सांगत योगेश्वर यांनी भविष्यात आपला तो कार्यक्रम राहणार आहे, हेच सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विजयेंद्र यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हापासूनच पक्षातील एक मोठा गट त्यांच्या विरोधात होता. पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पक्षांतर्गत विरोधकांना चांगलेच बळ आले आहे. ‘विजयेंद्र हटवा, पक्ष वाचवा’ हे अभियानच त्यांनी सुरू केले आहे.माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी आदींच्या नेतृत्वाखाली वक्फ बोर्ड विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. 25 नोव्हेंबरपासून 1 डिसेंबरपर्यंत पाच जिल्ह्यात हे आंदोलन चालणार आहे. सोमवारी बिदरमधून आंदोलनाला सुरुवात झाली. गुलबर्गा, यादगिरी, रायचूर, विजापूर, बागलकोटला हे अभियान पोहोचणार आहे. 9 डिसेंबरपासून बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनातही आवाज उठवण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला आहे. वक्फ बोर्डविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून अहवाल स्वीकारण्याचाही कार्यक्रम आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी 4 डिसेंबरपासून तीन पथकांचा राज्य प्रवास जाहीर केलेला असताना यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या स्वतंत्र आंदोलनाला पक्षातून विरोध होत आहे.
भाजपमधील या घडामोडी लक्षात घेता नव्या वर्षापर्यंत भाजप नेतृत्वामध्ये बदल होणार याची स्पष्ट लक्षणे आहेत. पक्षांतर्गत बंडाळीमुळे पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला, याचा हायकमांडला विचार करावा लागणार आहे. प्रथमच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व विजयेंद्र यांनी तोंड उघडले आहे. या स्वतंत्र आंदोलनाविरुद्ध हायकमांडकडे तक्रार करण्यात आली आहे. आता पक्षाचा अधिकृत दौरा जाहीर झालेला असताना सुरू केलेले स्वतंत्र आंदोलन म्हणजे पक्षविरोधी कारवाया ठरवून बसनगौडा पाटील-यत्नाळ व त्यांच्या सहकारी नेत्यांवर कारवाई होणार की या असंतुष्ट नेत्यांचा मागणीचा पुरस्कार करीत प्रदेशाध्यक्ष पदावरून विजयेंद्र यांना बाजूला केले जाणार, हे महिनाभरात स्पष्ट होणार आहे. हायकमांडचा निर्णय काहीही असला तरी पक्षांतर्गत संघर्ष थोपविणे कठीण जाणार आहे. कारण, सुरुवातीलाच या कारवायांना आळा घालण्यात आला नाही. पक्षाला पर्याय म्हणून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. हायकमांड मात्र गप्प आहे. याचाच अर्थ असंतुष्टांना त्यांचा पाठिंबा आहे, असा होतो. कर्नाटकात सध्या असेच चित्र पहायला मिळते आहे.