Ichalkaranji | इचलकरंजीतील धुळवडीत हुल्लडबाजी सायकलस्वाराला मारहाण,वाहनांची तोडफोड
इचलकरंजीत धुळवडीला हुल्लडबाजी
इचलकरंजी - शहरात होळी उत्साहात साजरी झाल्यानंतर मंगळवारी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकार घडले. मुख्य रस्त्यांवर गाड्या अडवून पैसे मागणे, राखेचे गोळे व दगडफेक करणे अशा प्रकारांमुळे सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असली तरी अधिकृत नोंद झालेली नाही.
दरवर्षीप्रमाणे शहरातील चौकाचौकांत होळी दहन करण्यात आले. दुसया दिवशी धुळवडीला मुले राखेचे गोळे घेऊन रस्त्यावर उतरतात आणि वाहनधारकांकडून पैसे मागतात. अनेक नागरिकही परंपरेनुसार प्रतिसाद देतात. मात्र, यंदा काही तरुणांनी या परंपरेला वळण दिल्याचे दिसून आले.एक टॅव्हल्स, एक टेम्पो, दोन खासगी बसेस, एक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची तर कर्नाटक राज्यातील एक बस यांसह दोन खासगी वाहनांचे नुकसान झाले. स्कूलच्या बसवरही दगडफेक झाली. गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर परिसरात हे प्रकार घडले. पोलिस बंदोबस्त असतानाही पथक पुढे सरकल्यानंतर काही तरुण पुन्हा रस्त्यावर येत असल्याचे दिसले.
माहिती मिळताच पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना समज दिली. गतवर्षीही अशा घटना घडल्या होत्या. सणाच्या आनंदावर विरजण घालण्प्रया या प्रकारामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त होत असून पुढील काळात कडक कारवाईची मागणी होत आहे.