रिंगरोडच्या कामाला अखेर सुरुवात
देवगिरी-बंबरगानजीक खोदकाम : 70 किलोमीटर लांबीचा होणार रिंगरोड
बेळगाव : बेळगाव शहराच्या भोवताली मंजूर झालेल्या रिंगरोडच्या कामाला मागील दहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. कडोलीजवळच्या देवगिरी ते बंबरगा या रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने चरी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अगसगे गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भल्या मोठ्या चरी मारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. बेळगाव शहराच्या अंदाजे 10 कि. मी. अंतरावर रिंगरोडला मंजुरी देण्यात आली होती. एकूण 70 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड होणार असून त्यामध्ये 32 गावांचा समावेश असणार आहे. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी रिंगरोडच्या कामाला आक्षेप घेतल्याने काम थांबले होते. परंतु मागील 8 ते 10 दिवसांपासून रिंगरोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
देवगिरी ते बंबरगा या गावांच्या दरम्यान रिंगरोडसाठी खोदाई केली जात आहे. मोठ्या चरी मारल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्येही सुरुवातीला याबाबत संभ्रम होता. अखेर रिंगरोडसाठी हे खोदकाम सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सध्या केवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या चरी मारल्या जात आहेत. हद्द निश्चित करून त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी पाहता रिंगरोडची आवश्यकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार जगदीश शेट्टर यांनी रिंगरोडच्या कामाबाबत जिल्हा प्रशासनाला प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे मागील 8-10 दिवसांपासून तातडीने या कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.