रिंग तयार नाही, राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सामने थांबले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा पहिला दिवस, जो रविवारी (4 जानेवारी) ग्रेटर नोएडामध्ये सुरू होणार होता, तो अनेक तास उशिरा सुरू झाला, कारण ज्या दोन रिंगमध्ये सामने होणार होते, त्या तयारच नव्हत्या. दुपारच्या सत्रात ज्यांचे सामने नियोजित होते, ते बॉक्सर गौतम बुद्ध विद्यापीठात पोहोचल्यावर त्यांना फक्त मोकळी जागा दिसली. दुपारी 2 वाजता नियोजित असलेले सामने अखेरीस संध्याकाळी 6:30 च्या सुमारास सुरू झाले.
सामान्यत कोणत्याही राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या सुरुवातीच्या किमान एक दिवस आधी रिंग उभारल्या जातात. रिंग घाईघाईने उभारल्या जात असताना बॉक्सर्सना थांबण्यास सांगण्यात आले. पहिल्या दिवशी पुरुष गटात 42 आणि महिला गटात 38 सामने होणार होते. तथापि, सुमारे चार तासांच्या विलंबामुळे, दिवसाच्या अखेरीस सर्व सामने पूर्ण होण्याची शक्यता कमी झाली. असे हि सांगण्यात येत आहे की कदाचित महिला बॉक्सरचे सामने एक दिवसासाठी पुढे ढकलले जातील असे येथे उपस्थित प्रशिक्षकाने सांगितले. प्रशिक्षकाने सांगितले की, गेल्या वर्षी याच ठिकाणी झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेतही असाच विलंब झाला होता, मात्र त्यावेळी त्या विलंबाचे कारण अतिवृष्टी होते. “रिंग तयार नसल्यामुळे राष्ट्रीय चॅम्पियनशिप होऊ शकत नाही, असे मी पहिल्यांदाच पाहिले आहे,“ असे प्रशिक्षक म्हणाले. तथापि, कोणताही विलंब आदर्श परिस्थिती नाही. “जेव्हा एखादा बॉक्सर स्पर्धेसाठी येतो, तेव्हा त्याला वजन कमी करावे लागते जेणेकरून त्याला स्पर्धेत भाग घेता येईल. आम्ही सकाळपासून येथे थांबलो आहोत आणि आम्हाला स्पर्धा कधी सुरू होईल याची काहीच कल्पना नाही. आम्ही जेवण केलेले नाही, कारण कोणत्याही स्पर्धेपूर्वी आमचा एक कठोर आहार योजना असते,“ असे उपस्थित बॉक्सरने वृत्तसंस्थेला महिती दिली. पुरुष आणि महिला गटातील 10 वजन गटांमध्ये 600 हून अधिक बॉक्सर स्पर्धा करणार आहेत, आणि पदक विजेत्यांची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड केली जाईल, जिथे त्यांना राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांसारख्या स्पर्धांसाठी तयार केले जाईल.