RIL AGM 2021 : 'जिओ फोन नेक्स्ट' गणेश चतुर्थीला येणार : मुकेश अंबानी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक महासभेमध्ये रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात 'जिओ फोन नेक्स्ट' ची घोषणा केली आहे.हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल, असेही मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितले.
या फोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचे ऑप्टिमाईज्ड व्हर्जन तयार करण्यात आले आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड, गुगल आणि जिओचे सर्व मोबाईल ॲप्लिकेशन्स युजर्सला वापरता येणार आहेत. खास भारतीय बाजारपेठेसाठी गुगल आणि जिओने संयुक्तपणे हा फोन विकसित केला असून इतर स्मार्टफोन फीचर्सप्रमाणेच या फोनमध्ये अनेक फीचर्स असणार आहेत. त्यामुळे लवकरच देशाला टूजी मुक्त करता येणे शक्य होणार असल्याचे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.
येत्या काही दिवसांत या फोनची किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत. 'जिओ फोन नेक्स्ट' आधी भारतात लाँच केला जाईल आणि नंतर जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे.
- मोबाइल डेटा कॅरियर बनला
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
- या वर्षात 37.9 दशलक्ष नवे ग्राहक
यावेळी मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये इतका आहे.