मनपाच्या शेजारी...पाणीपुरवठा आजारी
सुभाषनगरातील रहिवाशांना दहा वर्षांपासून पाणीसमस्या : अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष
बेळगाव : सुभाषनगर येथे एलअँडटीच्या मनमानी कारभारामुळे चार घरांना गेल्या दहा वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने प्रशासनासोबत संघर्ष करण्याची वेळ आली आहे. चार घरांच्या अंतरावर दोन व्हॉल्व्ह बसविण्यात आले असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. केवळ चार घरांनाच पाणी मिळत नसून, उर्वरित घरांना पाणी येत आहे. अनेक वेळा विविध अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे. महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय सुभाषनगर येथे आहे. मात्र, महानगरपालिकेच्या परिसरातच अशी परिस्थिती असेल तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी सुभाषनगर येथे चार घरांच्या अंतरावर दोन व्हॉल्व्ह बसविले आहेत.
त्यामुळे चार घरे वगळून बाजूच्या घरातील नळांना पाणी येत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यात यावी, अशी येथील रहिवासी संजय रणसुभे व इतर रहिवासी गेल्या दहा वर्षांपासून झगडत आहेत. जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, महानगरपालिका आणि एलअँडटीकडे तक्रार करून देखील कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवासी हतबल बनले आहेत. यापूर्वी आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पाणीसाठा खालावल्याने 13 ते 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच नळांना पाणी येत नसल्याने पाणी भरण्यासाठी सुभाषनगर येथील चार घरातील रहिवाशांना धडपड करावी लागत आहे. पाणी कधी व केव्हा येईल, याचा नेम नाही. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही जागे राहण्याची वेळ आली आहे. या गंभीर समस्येकडे मनपा किंवा एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.