बॉस इज ऑलवेज राईट...मुरलीधर जाधवांनी चुकिचा निर्णय घेऊ नये- संजय पवार
पक्षाच्या नियुक्त्या करणे किंवा त्या रद्द करणे हे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत. तसेच त्यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी कोणी जावं आणि कोणी नाही याचा अधिकार कोणत्याच शिवसैनिकाला नसल्याचा खुलासा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी भेट भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी चर्चांना ऊत आला. त्यामुळे हातकणंगले मतदार संघातून लोकसभेसाठी ईच्छुक असलेले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्या आघाडीतील प्रवेशाला विरोध केला. आणि राजू शेट्टी यांच्यावर शेलक्या शब्दात टिका केली.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी धक्कादायक निर्णय घेत मुरलीधर जाधव यांच्याकडून जिल्हाप्रमुख पद काढून घेतलं. वरिष्ठांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांचा गैरसमज झाला असल्याचे म्हटले आहे. यावेळी ते म्हणाले, "जिल्हा प्रमुखपद नियुक्त करणे किंवा रद्द करणे हे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत. मुरलीधर जाधव यांनी 18 19 वर्ष शिवसेनेसाठी चांगले काम केलं आहे. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मात्र मातोश्रीवर कोणी जायचं आणि कोणी नाही जायचं याचा अधिकार शिवसैनिकाला नसतो. मुरलीधर जाधव यांचा विनाकारण गैरसमज झाला. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. त्यांनी पक्षासोबतच राहावं पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी का घेतला याचा विचार आपण करायचा नाही." असे आवाहन त्यांनी केलं आहे.