रिकी पाँटिंग पंजाब किंग्सचे प्रमुख प्रशिक्षक
ट्रेव्हर बेलीस यांच्या जागी फ्रँचायजींनी केली 4 वर्षांसाठी नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग यांची पंजाब किंग्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाची सुमार कामगिरी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच टेव्हर बेलीस यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेली सात वर्षे दिल्ली कॅपिटल्समध्ये काम पाहिल्यानंतर पाँटिंग आता पंजाब किंग्सकडे वळले आहेत. ‘पाँटिंग यांनी बुधवारी नव्या करारावर स्वाक्षरी केली असून चार वर्षांसाठी त्यांची नियुक्ती झाली. संघबांधणीसाठी तितका वेळ त्यांना देणे आवश्यक आहे. पाँटिंगच्या सूचनेनुसार साहायक स्टाफची निवड केली जाईल,’ असे आयपीएलमधील सूत्राने सांगितले.
पाँटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाची ताकद वाढली होती. त्यांनी 2020 मध्ये आयपीएलची अंतिम फेरीही गाठली होती, पण जेतेपद मिळविण्यात त्यांना अपयशच आले. त्यांनी त्याआधी मुंबई इंडियन्समध्ये प्रशिक्षकपदाची भूमिकाही बजावली होती. पंजाब किंग्स संघानेही आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे या संघाचे चार सहमालक विश्वचषक विजेत्या माजी कर्णधाराकडून ही कसर भरून काढण्याची अपेक्षा करीत आहेत. पंजाबने फक्त एकदाच 2014 मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. या संघात वारंवार बदल करण्यात येतात, त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली आहे. गेल्या सात आवृत्त्यांमध्ये पंजाबला टॉप पाच संघांतही स्थान मिळविता आलेले नाही आणि यावर्षी झालेल्या स्पर्धेत त्यांना दहा संघांत नववे स्थान मिळाले होते. गेल्या दोन मोसमात बेलीस तर त्याआधी अनिल कुंबळे या संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते.