For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात उद्यापासून रिक्षाची भाडेवाढ

11:16 AM Feb 28, 2025 IST | Radhika Patil
जिल्ह्यात उद्यापासून रिक्षाची भाडेवाढ
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांच्या संयुक्त बैठकीत रिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.पहिल्या टप्यासाठी 25 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 23 रुपये अशी भाडेवाढ करण्यात येणार आहे.या भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च पासून होणार आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर  जिह्यातील महानगरपालिका क्षेत्राकरिता (कोल्हापूर व इचलकरंजी) ऑटोरिक्षांसाठी रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या 25 टक्के अतिरिक्त भाडेदर राहील. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीसाठी किमान भाडेदराच्या 40 टक्के अतिरिक्त भाडेदर राहील. प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेंमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी 3 रुपये इतके शुल्क राहील. भाडेदर सुधारणा 1 मार्च पासून लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणिकरण ( Meter Calibration) करण्यासाठी 1 मार्च पासून 31 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.1 मार्च पासून ऑटोरिक्षांकरिता सुधारित भाडेदर लागू होत असल्याने,जे ऑटोरिक्षाधारक 1 मार्च पासून मीटर पुन:प्रमाणीकरण करुन घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडेसुधारणा लागू राहील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

Advertisement

  • अशी आहे भाडेवाढ

सद्याचा भाडेदर - 22 रुपये व सुधारित भाडेदर 25 रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाडे - 18 रुपये वरून सुधारित भाडेदर 23 रुपये याप्रमाणे असणार आहे.

  • मुदतीत पुन: प्रमाणीकरण न केल्यास कारवाई

जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुन:प्रमाणीकरण करुन घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. दिलेल्या मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन, मात्र किमान 7 दिवस तथापी कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहील. मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रु. मात्र किमान 500 रुपये तथापी कमाल तडजोड शुल्क 2 हजार रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असेही भोर यांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :

.