गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद परीक्षेत ऋचा प्रभूदेसाईचे यश
देवगड- प्रतिनिधी
मूळ देवगड तालुक्यातील किंजवडे येथील व कामानिमित्त सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या कु. ऋचा विश्वास प्रभूदेसाई हिने पुणे येथील गांधर्व महाविद्यालयाच्या एप्रिल- मे २०२५ मध्ये झालेल्या संगीत विशारद (गायन) परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह यश मिळविले आहे. कु. ऋचा ही किंजवडे येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा व संगीत विशारद विश्वास प्रभूदेसाई यांची कन्या आहे.कु. ऋचा हिला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. कुटुंबातच संगीत कलेचा वारसा असल्याने तिनेही संगीत साधना जोपासली होती. ही कला जोपासत असताना तिने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दर्शविला. कीर्तन कार्यक्रमांना संगीत साथ, तर सुगम संगीत कार्यक्रमांनीही ती हार्मोनियम साथ देते. देवगड महाविद्यालयात बीएससी आयटीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामानिमित्त तिचे पुणे येथे वास्तव्य झाले. तेथे दैनंदिन कामातूनही तिने संगीत साधनेला अधिक महत्व दिले आणि याच संगीत साधनेतून तिने गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विशारद (गायन) परीक्षेत विशेष प्राविण्यासह उल्लेखनीय यश प्राप्त केले. यासाठी तिला पुणेस्थित व्यावसायिक हिंदूस्थानी शास्त्रीय गायिका व हार्मोनियम वादक सौ. शुभदा आठवले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कु. ऋचा हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे