For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएल कार्डधारकांचा तांदूळ पुरवठा ठप्प

10:46 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
एपीएल कार्डधारकांचा तांदूळ पुरवठा ठप्प
Advertisement

मध्यमवर्गीयांना फटका : राज्य सरकारकडून कोटा बंद केल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय : एपीएल कार्डधारकाकडून रेशनची मागणी

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारकडून एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना रेशनपासून वंचित रहावे लागले आहे. यंदा पावसाअभावी पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात तांदळाचे दर भरमसाट वाढले आहेत. त्यामुळे एपीएल कार्डधारकाकडून रेशनची मागणी होत आहे. मात्र एपीएल तांदूळ पुरवठाच केला जात नसल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. एपीएल कार्डधारकांना प्रतिकिलो 15 रुपयांप्रमाणे मासिक 10 किलो धान्य वितरीत केले जाते. बाजारात तांदळाच्या किंमती अधिक असल्याने बीपीएल कार्डधारक रेशन तांदूळ नेण्यास प्राधान्य देतात. मात्र शासनाकडूनच तांदळाचा साठा बंद झाल्याने एपीएल कार्डधारकांना तांदळाविना रहावे लागत आहे. परिणामी जादा पैसे मोजून बाजारातून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही बसू लागला आहे. मागील दोन महिन्यांपासून एपीएल कोट्यातील तांदळाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे नागरिकांना तांदळासाठी धडपड करावी लागत आहे. यंदा तांदूळ उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात तांदळाचे भाव वाढले आहेत.  एपीएल कार्डधारकांची रेशनच्या तांदळाची मागणी वाढू लागली आहे. मात्र पुरवठाच होत नसल्याने तांदळापासून दूर रहावे लागले आहे.

बीपीएल कार्डधारक संख्येत वाढ

Advertisement

अलिकडे बीपीएल कार्डधारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बीपीएल कार्डधारकांसाठीचा असणारा कोटा वाढला आहे. त्यामुळे धान्यासाठी अतिरिक्त ताण वाढू लागला आहे. याचा परिणाम एपीएल कोट्यावर झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात 70 टक्के लाभार्थ्यांकडे बीपीएल कार्डे आहेत. त्यामुळे बीपीएल तांदळाचा कोटा वाढला आहे. सद्य परिस्थितीत बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती मोफत पाच किलो धान्याचा पुरवठा केला जात आहे. त्याबरोबर अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती मासिक 170 रुपये दिले जात आहेत. त्याबरोबर एपीएल कार्डधारकांना प्रतिकिलो 15 रुपयांप्रमाणे 10 किलो धान्य देणे आवश्यक आहे. मात्र सरकारकडून पुरेशा धान्याचा पुरवठा होत नसल्याने एपीएल कार्डधारकांना रेशनच्या तांदळापासून वंचित रहावे लागत आहे.

एपीएल कार्डधारकांकडून तांदळाच्या मागणीत वाढ

रेशन दुकानांमध्ये एपीएल कार्डधारकांकडून तांदळाची मागणी होत नव्हती. शिवाय तांदळाची दर महिन्याला उचल देखील कार्डधारकांकडून केली जात नव्हती. मात्र आता बाजारात तांदळाच्या किंमती वाढल्याने एपीएल कार्डधारकांकडून रेशनच्या तांदळाची मागणी वाढू लागली आहे.

मागणी वाढल्यास पुन्हा तांदूळ पुरवठा

जिल्ह्यात बीपीएल कार्डधारकांची संख्या अपेक्षेपेक्षा वाढली आहे. साहजिकच बीपीएल कार्डधारकांसाठी मोठ्या प्रमाणात तांदळाचा साठा लागत आहे. त्यामुळे एपीएल कार्डचा तांदूळ पुरवठा बंद करण्यात आला आहे. एपीएल कार्डधारकांकडून तांदळाची मागणी वाढल्यास पुन्हा तांदळाचा पुरवठा केला जाईल.

 - श्रीशैल कंकणवाडी,सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते

वाढीव पुरवठा केल्यास एपीएलधारकांना तांदूळ

एपीएल कार्डधारकांच्या कोट्यातील रेशनचा तांदूळ ठप्प झाला आहे. राज्य सरकारकडून मागील दोन महिन्यांपासून कोटा थांबला आहे. त्यामुळे एपीएल कार्डधारकांना तांदूळ देणे अशक्य झाले आहे. सरकारने वाढीव पुरवठा दिल्यास एपीएलधारकांना तांदूळ वितरीत केला जाणार आहे.

- राजशेखर तळवार,राज्य उपाध्यक्ष रेशन दुकानदार वितरण संघटना

Advertisement
Tags :

.