For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात भात पेरणीला सुरुवात

10:41 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात भात पेरणीला सुरुवात
Advertisement

बैलजोडी-ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात पेरणी, शेतकऱ्यांसह मजूर व्यस्त : पावसाच्या उघडिपीची गरज

Advertisement

वार्ताहर /नंदगड

खानापूर तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतवडीत ओलावा निर्माण झाला आहे. पूर्व भागात शेती मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. तर दक्षिण व उत्तर भागासह तालुक्याच्या बहुतांशी भागातील शेतकरी  पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. खानापूर तालुक्यात 36 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड करण्यात येते. त्यापैकी 28 ते 30 हजार एकर जमिनीत भाताची पेरणी केली जाते. तर उर्वरित जमिनीत भाताची लागवड करण्यात येते. जांबोटी, कणकुंबी, शिरोली वगळता इतर भागात भात पेरणी करण्यासाठी धांदल सुरू होते. तर जांबोटी, कणकुंबी, शिरोली भागात जून महिन्याच्या उत्तरार्धात मोठ्या पावसात भाताची लागवड केली जाते. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी काठच्या शेतवाडी तसेच पूर्व भागात ज्यांच्याकडे बोअरवेल आहेत असे शेतकरी ऊसाची लागवड करतात. तर उर्वरित जमिनीत भाताचे पीक घेतले जाते. भात हे खानापूर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. नंदगड, हलशी, कापोली नागरगाळी, कुंभार्डा, लोंढा, गुंजी, नेरसा, करंबळ, खानापूर, इदलहोंड, रामगुरवाडी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बरगांव, लोकोळी, चापगाव, बिडी, कक्केरी, भुरुणकी, गोधोळी आदी भागात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे या भागातील शेतकरी गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत होते.

Advertisement

यावर्षी आठवडाभर अगोदर पावसाला सुरुवात झाल्याने मशागतीची कामे वेळेत झाली. पूर्वी मशागतीची कामे बैलजोडीच्या साहाय्याने केली जात होती. अलीकडे गावोगावात अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणले आहेत. ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करण्यात येतात. तर अलीकडच्या चार-पाच वर्षात ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जात आहे. त्यामुळे बैलजोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी बैलजोडीची आवश्यकता आहे. परंतु एकाच वेळी सर्वांची पेरणी येत असल्याने बैलजोडी मालकांना बराच भाव आला आहे. पेरणी करण्यासाठी बैलजोडी मालक, पेरणी करणारी महिला व अन्य एक दोनजण मजूर लागतात. सर्वांची एकाच वेळी पेरणी होत असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन पेरणीची कामे आटोपून घेत आहेत.

आणखी चार दिवस पाऊस जाणे गरजेचे

तालुक्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने बिडी, कक्केरी, बेकवाड इटगी, गंदीगवाड, तोलगी, मंग्यानकोप परिसरात मोठा पाऊस झाल्याने पाणथळ जमिनीत बऱ्याच प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे जमीन सुकण्यासाठी आणखीन चार दिवस पाऊस जाणे गरजेचे आहे. संबंधित भागातील शेतकरी रासायनिक खते व बी बियाणे जमविण्याच्या लगबगीत आहेत. सध्या शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे आपापल्या पालकांबरोबर शाळकरी मुलेही पेरणीसाठी आपल्या परीने मदत करताना दिसून येत आहेत.

Advertisement
Tags :

.