पुरेसा पाऊस पडल्याशिवाय भात पेरणी करू नये
जिल्हा कृषी अधीक्षकांचे शेतकऱ्यांना आवाहन ;आवळेगावला शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा
कडावल / वार्ताहर
यंदाचा खरीप हंगाम एल निनोच्या सावटाखाली असल्याने कमी दिवसाची भात बियाणे वापरावीत.शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय भात पेरणी करू नये तसेच कृषि विभाग सल्ल्याप्रमाणे आपली दिशा ठरवावी. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्थानिक भात बियाण्यांची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे यांनी आवळेगाव येथे शेतकऱ्यांना केले. स्थानिक पातळीवर एल निनो प्रभावाबाबत जनजागृती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे एका विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी श्रीमती नाईकनवरे बोलत होत्या. आवळेगाव सरपंच पूर्वा सावंत, उपसरपंच विवेक कुपेरकर,कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले, मंडळ कृषि अधिकारी तानाजी सगरे,उप कृषि अधिकारी श्रद्धा वाडेकर ,सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे, कृषि सेवक निखिल ढोकणे तसेच ग्रामपंचायत सदस्य आदीची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती नाईकनवरे म्हणाल्या, सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्थानिक भात बियाण्यांची लागवड करावी. बाजारातील महागड्या बियाण्यांवर अवलंबून न राहता स्वतःचे पौष्टिक आणि दर्जेदार बियाणे स्वतःच तयार करावे. यावर्षीचा खरीप हंगाम एल निनोच्या सावटाखाली आहे. त्यामुळे कमी कालावधीची भात बियाणे शेतकऱ्यांनी वापरावीत.कृषी विभागाचा सल्ला घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले. श्री चौगले म्हणाले,गोकृपा अमृत कल्चर या सेंद्रिय द्रावणचा वापर आपल्या शेतीत करावा आणि जास्तीत जास्त शेतक-यांनी आपली वाटचाल करावी.आपली संपूर्ण शेती सेंद्रिय होण्याकडे लक्ष केंद्रित करून शेती करावी आणि आपले संपूर्ण गाव गोकृपा अमृत कल्चर या सेंद्रिय द्रावणाच्या वापराखाली आणावे, असे आवाहन केले.तसेच सरपंच पूजा सावंत व उपसरपंच विवेक कुपेरकर यांच्या उपस्थितीत सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे यांनी गोकृपा अमृत आणि लाल घाटीपंकज वापरून भात बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक यशस्वीरीत्या दाखविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाग्यश्री नाईकनवरे यांचा, ग्रा.पं.सदस्या शुभदा सावंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात भाग्यश्री नाईकनवरे यांच्या हस्ते गावातील प्रगतशील शेतकरी यांना ४० लीटर गोकृपा अमृतचे वाटप करण्यात आले. ज्याच्या सहाय्याने पुढील आठवड्यात या गावात तब्बल ४ हजार लिटर सेंद्रिय जीवाणू संवर्धन विद्राव तयार होणार आहे. याच कार्यक्रमात 'ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी ऋतुराज सावंत यांच्या मार्फत उपस्थित शेतकऱ्यांना स्थानिक भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाचे तानाजी सगरे, श्रद्धा वाडेकर, प्रिया खरवडे व निखिल ढोकणे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच सरपंच श्रीमती सावंत व उपसरपंच श्री .कुपेरकर यांच्या विशेष सहकार्यातून हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहात झाला.