तांदळाच्या टंचाईमुळे जपानमध्ये गदारोळ
कृषिमंत्र्याला द्यावा लागला राजीनामा : तांदळाच्या किमती वाढल्याने लोकांमध्ये आक्रोश
वृत्तसंस्था/टोकियो
जपानमध्ये पुन्हा एकदा तांदळाची कमतरता निर्माण झालीआहे. देशात तांदळाचे दर वाढल्याने आता याप्रकरणी राजकारण गतिमान झाले आहे. तांदळाची वाढती महागाई आणि कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे तेथील कृषिमंत्री ताकू एटो यांना स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तांदळाला जपानी संस्कृती, परंपरा आणि राजकारणाचे खतपाणी मानले जाते. लोक तांदळाला स्वत:च्या अस्मितेशी जोडतात. जपानमध्ये ज्या तांदळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, तो वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्याला जापोनिका म्हटले जाते. जपानमध्ये भातपिक अन्नपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तांदूळ जपानी आहारचा प्रमुख हिस्सा आहे.
जपानमध्ये बहुतांश लोक भाताला स्वत:च्या दैनंदिन आहारात वापरतात. जपान हा जगातील भाताचा नवव्या क्रमाकांचा उत्पादक देश आहे. जपानच्या सुपरमार्केटमधून तांदूळ गायब होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि आता ही किंमत दुप्पट झाली आहे. जपानच्या कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जपान कृषी सहकारी समित्या आणि अन्य वाणिज्यिक घाऊक विक्रेत्यांकडे तांदळाचा साठा मागील वर्षाच्या पातळीपेक्षा 4 लाख टनांनी कमी आहे. तांदळाचा साठा नीचांकी स्तर म्हणजेच 1.53 दशलक्ष टनावर पोहोचला आहे.
का होतेय टंचाई?
जपामध्ये तांदळाचा दर मागील वर्षापासून वाढत आहेत. भूकंप होण्याच्या भीतीपोटी लोकांनी तांदळाची खरेदी मोठ्या प्रमाणात करत अनेक महिन्यांसाठी साठा जमविला आहे. याचबरोबर मागील वर्षी नूडल्सच्या किमती वाढल्याने लोकांनी तांदळाची खरेदी वाढविली होती आणि तांदळावर लोक अधिक अवलंबून राहिले होते. याचबरोबर युक्रेन-रशिया युद्धामुळे गव्हाच्या किमतीत वाढल्याने याचा परिणाम तांदळाच्या साठ्यावरही पडला आहे.
कृषिमंत्र्यांनी राजीनामा का दिला?
जपानचे कृषीमंत्री एटो यांचे एक वक्तव्य लोकांना रुचले नाही. मी कधीच तांदूळ खरेदी करण्याची तसदी घेतली नाही, कारण माझे समर्थक मला भेटवस्तू म्हणून तांदूळ देत असतात असे वक्तव्य एटो यांनी केले होते. या वक्तव्यानंतर जपानच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आणि एटो यांना राजीनामा द्यावा लागला. आता एटो यांची जागा शिंजरो कोइजुमी यांनी घेतली आहे.