अगसगे गोदामातून तांदूळ गायब
अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी
बेळगाव : अगसगे (ता. बेळगाव) येथील पीकेपीएसमधून योग्यरित्या धान्य वितरण केले जात नसल्याची तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेऊन बेळगाव येथील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी गरिबांसाठी सरकारने पुरवठा केलेल्या अन्नभाग्यातील तांदळाची लूटमार होत असल्याचे सिद्ध झाले. बेळगाव तालुका आहार विभागाचे उपतहसीलदार एम. एन. उस्ताद, तालुका आहार निरीक्षक सुरेश उप्पार, सतीश बेनगी यांनी संयुक्तपणे मंगळवारी सकाळी अगसगे पीकेपीएसला अचानक भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार मांडली. मागील महिन्याचे धान्य वाटप अद्याप झाले नसल्याची लेखी तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी कसून चौकशीला सुरुवात केल्यानंतर अन्नाचे गोदाम रिकामे असल्याचे दिसून आले. यावेळी गोदामातील काही तांदूळ शेजारील चलवेनहट्टी गावात असल्याची सारवासारव सुरू केली. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता चलवेनहट्टीला भेट देऊन पाहणी केली.
चलवेनहट्टीत मिळाले 4 क्विंटल तांदूळ
अधिकाऱ्यांनी चलवेनहट्टी येथे पाहणी केल्यानंतर तेथे शिधापत्रिकाधारकांचे दोन हजार किलोहून अधिक तांदूळ असणे आवश्यक होते. मात्र तेथे केवळ 400 किलो तांदूळ आढळून आले. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अंदाजानुसार दोन हजारहून अधिक किलो तांदूळ गोदामामध्ये असणे आवश्यक होते. 1600 किलो तांदूळ गेले कुठे? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. अधिक चौकशीनंतर हा तांदूळ विक्री केल्याचे समजून आले.