पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर
सोयाबीन, भुईमूग, बटाटे, रताळी पिकालाही मोठा फटका : शेतकरी पाऊस कमी होण्याच्या प्रतीक्षत्
बेळगाव : हातातोंडाची आलेल्या भातपिकाचे पावसामुळे नुकसान होते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात उद्भवू लागली आहे. मागील चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. भातपीक कापणीला आले असले तरी पावसामुळे कापणीला विलंब होत आहे. काही ठिकाणी भातपीक पूर्णपणे खाली पडले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सततच्या पावसामुळे शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे भुईमूग, सोयाबीन, रताळे व बटाटा पीक अद्याप शेतातच आहे. मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीन व भुईमूगाची बियाणे पुन्हा शेतात पडत असल्याने पुन्हा अंकूर फुटत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत भरच पडत चालली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा सुरू झाल्यापासून अद्यापही संकटाचा सामना करावा लागत आहे.
उरले-सुरलेही जाते की काय?
जिल्ह्यात मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. यामुळे नदी व नाल्यांना महापूर आल्याने पाणी शेतात आले. त्यामुळे पीक वाया गेले. याचा शेतकऱ्यांना फटका बसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले. शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही करून घेतली. मात्र सततच्या पावसामुळे समस्येत आणखी भर पडली. पण शेतकऱ्यांनी शेतातील पाणी ओसरल्यानंतर पुन्हा भात लागवड व पेरणी केली, खतांची मुबलकप्रमाणात मात्राही दिली. त्यामुळे उत्पादन घटले असले तरी काही प्रमाणात पीक हाती लागले आहे. पण, तेही आता वाया जाते की काय? या भीतीखाली शेतकरी आहे.
आता शेतकऱ्यांच्या नजरा पाऊस कमी होण्याकडे
सततच्या पावसामुळे कापणीविना पिके शेतातच पडून आहेत. यामुळे याचा फटका पिकांना बसत असून, शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीची चिंता लागून राहिली आहे. आधीच पावसामुळे आर्थिक संकट ओढावलेले शेतकरी हाती लागलेल्या पिकांच्या कापणीच्या तयारीला लागणार होते. मात्र पावसामुळे कापणी लांबणीवर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पाऊस कमी होण्याकडे लागल्या असून, पाऊस ओसरल्यानंतच कापणीला वेग येईल. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असली तरी, उपनगरासह ग्रामीण भागात अद्याप पिकांची कापणी झालेली नाही. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, रताळी व बटाटा पीक अद्याप शेतातच आहे. पीक काढण्याची तयारी करत असतानाच उसंत घेतलेला पाऊस पुन्हा सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा डोकेदुखी वाढली. या पावसाचा पिकांवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी काही प्रमाणात पिकाचे पुन्हा नुकसान होणार, या चिंतेत शेतकरी आहेत.