आरजी’चा क्लेश आणि डॉ. केतन भाटीकरांचा मृत्यू
राजकारणात राजकीय पक्ष दुभंगणे, हा अनोखा प्रकार नाही. भारतीय राजकारणाचा तो इतिहासच आहे. गोवाही याला अपवाद नाही मात्र बाळसे धरण्याआधीच पक्ष दुभंगण्याच्या वाटेवर, हा मात्र अनोखाच प्रकार आहे. ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’कडून गोमंतकीयांनी आता काही अपेक्षा ठेवायच्या की नाही, असा प्रश्न जनतेच्या मनात घोळू लागल्यास नवल नाही. रिव्होल्युशनरी गोवन्सचे पतन होणे गोव्यातल्या काँग्रेसला सुसह्या वाटणारे आहे आणि भाजपाला मात्र चिंतेत टाकणारे आहे. डॉ. केतन भाटीकर यांचा मृत्यू जेवढा गोमंतकीयांना चटका लावून गेला तेवढाच ‘आरजी’मधील क्लेषही नैराश्य पसरविणारा ठरला आहे.
राजकीय क्षेत्रात गोव्यात चिंतेचा ठरलेला विषय म्हणजे ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’ पार्टीमध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून चाललेल्या नकारात्मक घडामोडी. हा पक्ष दुभंगण्याच्या मार्गावर आहे. राजकीय पक्षात उभी फूट पडणे किंवा तिची शकले होणे, यात विशेष काही नाही. भारतीय राजकारणाचा तो इतिहासच आहे. अपवाद वगळता प्रत्येक पक्षाला अशा स्थितीला तोंड द्यावे लागले आहे. गोव्यात एकेकाळी भाऊसाहेब बांदोडकरांनाही पक्षांतर्गंत बंडाळी मोडून काढावी लागली होती. शशिकलाताईंच्या काळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातूनच ‘भाबांगो’ची निर्मिती झाली होती. ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी काँग्रेस सत्तेवर येताच, डॉ. विली डिसोझा यांनी दोन-तीन आमदारांना घेऊन ‘गोवा काँग्रेस’ची स्थापना केली होती. महाराष्ट्रात आज दोन शिवसेना आहेत. दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. देशात काँग्रेसनेही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. कम्युनिस्टांनाही वेगळ्या चुली मांडाव्या लागल्या होत्या. गोव्यात ‘मगो’ आणि ‘भाबांगो’ तसेच ‘काँग्रेस’ आणि ‘गोवा काँग्रेस’ यांचे कालांतराने फेरमिलन झाले. या इतिहासापुढे गोव्यातील ‘आरजी’चे राजकारण मात्र पोरखेळ वाटण्यासारखे आहे. कारण हा पक्ष अद्याप बाल्यावस्थेत आहे.
यापूर्वी फुटलेले पक्ष एकतर सत्तेवर होते किंवा त्यांनी काही काळ सत्ता भोगलेली तरी होती. हे पक्ष राजकारणात मुरलेले होते. सत्तेचा माज त्यांना होता. ते राजकारणात परिपक्व होते. ‘आरजी’चे मात्र तसे नाही. पाच वर्षांपूर्वीच त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाची तयारी केली. ध्येय आणि दिशा ठरवूनच हा पक्ष निवडणुकीत उतरला. एका ध्येयप्रेरीत चळवळीचे राजकारणात परिवर्तन झाले. टोकाची विचारसरणी पटणारी नसली तरी जनतेनेही त्यांच्या मुद्द्यांना व त्यांच्या भावनांना पाठबळ दिले. पदार्पणातच दहा टक्के मते खिशांत टाकता आली. एक आमदारही जनतेने या पक्षाला दिला. विशेष म्हणजे परप्रांतियांच्या मतांवर उघडपणे पाणी सोडून, पक्षाने नजरेत भरेल एवढे यश प्राप्त केले. मागच्या चार वर्षांत गरज होती, पक्ष आणखी मजबूत करण्याची, जनतेचे पाठबळ वाढविण्याची. एकाचे चार आमदार करण्याची. त्यासाठी एक आमदार आणि समर्पित वृत्तीने काम करणारे निवडक कार्यकर्तेही पुरेसे होते. उच्च शिक्षित आणि समर्पित वृत्तीचे कार्यकर्ते या पक्षाकडे होते आणि आहेत.
या चळवळीची गोव्याला गरज आहे मात्र आज भलतेच घडत आहे. आमदार वीरेश बोरकर आपल्या गटासह पक्षापासून बरेच दूर गेलेले आहेत. ही एक तर राजकीय अपरिपक्वता असावी किंवा स्वार्थ आडवा आला असावा. आमदार वीरेश बोरकर यांचे आणि काँग्रेसच्या नेत्यांचे संबंध चांगले आहेत. त्यांच्यावर काँग्रेसची नजर आहे. कदाचित ‘आरजी’च्या बळावर आपण पुन्हा निवडून येईन, याची शाश्वतीही आमदार बोरकर यांना नसावी. ‘आरजी’ला मते देऊन भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी आपण मदत करतो, असेही काही भाजपाविरोधी लोकांना वाटत आलेले आहे. याचीही चिंता आमदार बोरकर यांना वाटत असावी. त्यासाठी वेगळी वाट धरावी लागेल, असा विचार त्यांच्या मनात घोळत असल्यास नवल नाही. ‘आरजी’कडून गोमंतकीय जनतेच्या मात्र बऱ्याच अपेक्षा होत्या व आहेत. आता या अपेक्षांना खिळ बसणार आहे. सध्याच्या बंडाळीमुळे पक्षाच्या प्रतिमेला अधिकच झळ बसणार आहे. कदाचित भविष्यात ‘आरजी’ला निवडणुकीच्या राजकारणात उतरावे की, गोमंतकीयांच्या भवितव्यासाठी चळवळ बनून कार्यरत राहावे, याचा विचार करावा लागेल.
दुसरा धक्कादायक आणि गोमंतकीयांच्या मनाला चटका लावणारा विषय म्हणजे, डॉ. केतन भाटीकर यांचा अकाली मृत्यू. गोव्यातील एक उमदे नेतृत्व, विद्वान, सकारात्मक, निर्भीड, परोपकारी, सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व अशी डॉ. केतन भाटीकर यांची प्रतिमा जनमानसात होती. राजकारण आणि समाजकारणात आवश्यक असलेले गुण या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेले होते. अलीकडे ते विधानसभेबाहेरील बुलंद आवाज ठरलेले होते. भविष्यात विधानसभेतही त्यांचा आवाज बुलंद होईल, अशी जनतेची अपेक्षा होती. तरुणांनी समाजकारण व राजकारणात प्रवेश करावा, ध्येय बाळगून जनहिताचे कार्य करावे, असे जनतेला वाटते. याच भावनेने डॉ. केतन भाटीकर यांचे राजकारणात स्वागत झाले. दुर्दैवाने त्यांचा अकाली अस्त झाला. जन्माला येणारा प्रत्येक जीव माघारी जाण्यासाठीच येत असतो. मृत्यू हे अंतिम सत्य मान्य केले तरी कुणी, कधी आणि कसे जावे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. डॉ. भाटीकरांचा अकाली मृत्यू हा संशयास्पद नसला तरी ज्या पध्दतीने त्यांचा मृत्यू झाला, ते पाहता कुणी चौकशीची मागणी केली तर ते गैर म्हणता येणार नाही. त्यांचा मृत्यू हे त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर गोमंतकीयांचे नुकसान आहे. ते लोकप्रतिनिधी नव्हते तरी ते लोकांचे नेतेच होते. केवळ अॅड. राधाराव ग्रासियस म्हणतात म्हणून नव्हे किंवा डॉ. भाटीकरांच्या कुटुंबाला नको म्हणून नव्हे तर एक जबाबदारी म्हणून सरकारने त्यांच्या मृत्यूची चौकशी करायला हवी. चौकशी म्हणजे त्यांच्या जवळच्या मित्रावर संशय घेणे, असा अर्थ होत नाही. डॉ. भाटीकरांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या घरात झालेला नाही. त्यांचा मृत्यू अंधाऱ्या रात्री घाटावरील जंगलातील रस्त्यावर झालेला आहे. त्यामुळे सरकारने चौकशीची जबाबदारी निभावणेच इष्ट ठरेल.
अनिलकुमार शिंदे