For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरेश पेरकरना आरजीपीची नोटिस

04:16 PM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
विरेश पेरकरना आरजीपीची नोटिस
Advertisement

कोणालाही पक्ष संपवू देणार नाही : आरजीपीचे अध्यक्ष परब यांची ग्वाही

Advertisement

पणजी : काल रविवारी पक्षकार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अजय खोलकर, विश्वेश नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या कित्येक दिवसांपासून आरजीमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. आमदार बोरकर आणि अध्यक्ष परब यांच्यात मतभेदांची मोठी दरी निर्माण होऊन वाद विकोपाला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर परब यांनी रविवारी गाभा समितीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार विरेश बोरकर यांच्यासह चार पदाधिकारी अनुपस्थित होते, असे परब यांनी सांगितले.

आमदाराने कार्यालयात येऊन पक्ष ताब्यात घ्यावा

Advertisement

मुळात कुणा एकाच्या मर्जीखातर एखादा पक्ष विसर्जित किंवा बरखास्त करता येत नाही. त्यामागे मोठी कायदेशीर प्रक्रिया असते. अशावेळी आमदार जर तसा विचार करत असतील तर त्यांनी वेळीच सावध व्हावे. किंवा पक्ष कार्यालयात येऊन रितसर प्रक्रियेद्वारे तो ताब्यात घ्यावा. कारण काही गोष्टींना पुरावे नसतात, पण वेळ हेच त्याचे उत्तर असते, आणि ते लवकरच सिद्ध होईल, असे परब म्हणाले.

ज्युलियस आल्मेदा पेरतोय वीष : परब

दरम्यान, आमदारासोबत वावरणारा आणखी एक माणूस म्हणजे ज्युलियस आल्मेदा हाही त्यांचे कान भरत असून त्यासंबंधी वारंवार सावध करूनही आमदार त्याची साथ सोडण्यास तयार नाहीत. सदर आल्मेदा हा पक्षाचा साधा सदस्यही नाही, आमदाराच्या कार्यालयात तो केवळ एक समन्वयक म्हणून नियुक्त आहे. तरीही गेल्या तीन वर्षांपासून त्याने मोठ्या प्रमाणात पक्षविरोधी कारवाया चालविल्या आहेत. तो जातीयवादाचा आधार घेत तो लोकांमध्ये विष पेरत आहे. या कारवायांची दखल घेऊन त्याला नोटिस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर दि. 16 एप्रिल रोजी आमदारांनाही नोटीस बजावण्यात आली व त्यानंतर तीन वेळा स्मरणपत्रेही पाठविण्यात आली आहेत. तरीही त्यांनी उत्तर देण्याचे किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सौजन्य दाखविलेले नाही, असे परब यांनी सांगितले. पक्षशिस्तीविरोधातील कारवाईसंबंधी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना, कारवाईच्या दृष्टीने आम्ही आजवर मवाळच धोरण ठेवले आहे. कधीही आक्रमक बनलेलो नाही. तसे झाले असते तर एव्हाना अर्धेअधिक कार्यकर्ते, पदाधिकारी घरी गेले असते. तरीही कधीकधी कठोर बनावेच लागते. त्यातून आतापर्यंत केवळ 6 ते 7 जणांविऊद्धच कारवाई झालेली आहे. यापुढे हे प्रकार अधिक खपवून घेतले जाणार नाहीत. बेशिस्ती किंवा पक्षात फूट पाडण्याची कारस्थाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई नक्की होईल, असा इशारा परब यांनी दिला.

बोरकर यांनी विजय सरदेसाईंचा आदर्श घ्यावा

खरे तर आमदार बोरकर यांच्या विधानसभेतील कामगिरीवर आम्ही आधीपासूनच खूष  आहोत. तरीही त्यांनी विजय सरदेसाई यांच्या कामगिरीतून धडा घेऊन अधिक आक्रमक बनावे, अशी आमची इच्छा आहे. तसे प्रत्येक आमदार सभागृहात स्वत:ची छाप पाडण्याचे प्रयत्न करत असतात. त्यात सरदेसाई बाजी मारून जातात. त्यांच्या या दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरीतून आदर्श घेऊन बोरकर यांनी सदैव सरस ठरावे, असे आम्हाला वाटते, असे परब म्हणाले.

आमदार विरेश बोरकरांबाबत तीन प्रमुख दावे

हा पक्ष ताब्यात घेण्याची आमदार विरेश बोरकर यांची मनिषा असून नुकत्याच मडगावात झालेल्या गुप्त बैठकीत स्वत: त्यांनीच तसा विचार मांडला होता, अशी माहिती प्राप्त झाल्याचा दावा परब यांनी केला. याकामी आदित्य देसाई नामक एक वकील त्यांचे मन कलुषित करत आहे. मात्र हा वकील अत्यंत भ्याड व पदराआडून वार करणारा माणूस आहे. त्यामुळे आमदारांनी त्याच्या नादी लागून स्वत:चे आणि पक्षाचेही नुकसान करून घेऊ नये. याप्रश्नी अनेकदा आपण स्वत: त्यांच्याशी बोललो आहे, रडलो आहे. तरीही त्यांचे मन वळत नाही, असे परब यांनी सांगितले. मात्र अशा भाडोत्री माणसांना घेऊन चालविलेले खेळ त्यांच्याच अंगलट येणार आहेत, असा इशारा परब यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.