रेयांश खामकरचा जलतरणात विक्रम
वृत्तसंस्था / ठाणे
ठाणे येथील सहा वर्षीय युवा जलतरणपटू रेयांश खामकरने 15 कि.मी. पल्ल्याच्या सागरी जलतरणात विक्रम केला आहे. सागरी जलतरणामध्ये असा विक्रम करणारा रेयांश खामकर हा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू असून याची नोंद रेकॉर्ड बुक्समध्ये झाली आहे.
कोकणातील विजयदुर्गमध्ये मालपे ते वाघोटन असे 15 कि.मी.चे सागरी अंतर रेयांशने 3 तासांच्या कालावधीत पूर्ण केले. या कामगिरीमुळे आता रेयांशचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. स्टारफिश स्पोर्ट्स फौंडेशनमध्ये त्याला कैलास आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि संस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार, अॅड. निरंजन देवखरे, राजेश मोरे यांनी त्याचे कौतुक केले आहे. 2024 च्या जुलैमध्ये रेयांशने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन राज्यामध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. कोल्हापूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत रेयांश खामकरने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक घेतले होते.