For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी आभासी प्रयोगशाळा सोनुर्ली विद्यालयात

01:32 PM Apr 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी आभासी प्रयोगशाळा सोनुर्ली विद्यालयात
Advertisement

विज्ञानाला दिशा देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्याला आदर्शवत ; डाएट प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन अध्यापनात नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयाचे कार्य कौतुकास्पद असून कोकणातील पहिली आभासी प्रयोगशाळा सुरू करुन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी गौरवोदगार काढले.राज्यातील शालेय शिक्षणात अध्ययन अध्यापनाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंमलबजावणी सुरू असुन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदकडून विविध विषयाच्या कौशल्य प्राप्तीसाठी कार्यक्रम राबविले जात आहेत याचाच एक भाग म्हणून माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली व ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी व्हर्च्यूअल रिॲलिटी* आभासी प्रयोगातून विज्ञान हे अध्ययन अध्यापन तंत्र विकसित करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित केली होती त्याचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र, पुणेच्या प्रमुख पल्लवी पराडकर,शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर, देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संस्थेचे अध्यक्ष दिगंबर मोर्ये, उपाध्यक्ष आनंद नाईक,सहसचिव नागेश गावकर, संचालक शंकर गावकर,भरत गावकर (उपसरपंच), लक्ष्मीदास ठाकूर,भारती गावकर,गोविंद मोर्ये, पं.स.सावंतवाडीच्या गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, केंद्रप्रमुख शिवाजी गावीत,कमलाकर ठाकूर,स्मिता नाईक, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक अरुण तेरसे,स्टेम लर्निगचे मनोज चव्हाण,विजय यादव,गोवा सायन्स सेंटरचे ब्रिजेश यादव,मुख्याध्यापक संघाचे प्रशांत सावंत, शिरीष नाईक, सिद्धार्थ तांबे,लवू सातार्डेकर, तानावडे,सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानुरकर, संघटक सत्यपाल लाडगावकर, चंद्रकांत चव्हाण,संजय शेवाळे,बी.आर.सी च्या स्नेहा गावडे, लता सातार्डेकर,ज्येष्ठ शिक्षक नितीन गवंडळकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी प्रशालेने आयोजित कार्यशाळेत ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र,पुणेच्या प्रमुख पल्लवी पराडकर, देवगड विज्ञान दलचे प्रमुख राहुल सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली १४ सहाय्यक मार्गदर्शकांसह विद्यार्थ्यांना कृतीयुक्त प्रयोग जोडणी करवून तसेच त्यामागील वैज्ञानिक संकल्पना समजून सांगितल्या या बरोबरच गोवा सायन्स सेंटरच्या सायन्स ऑन व्हीलच्या ५० हून अधिक कृतीयुक्त प्रयोगांचे मार्गदर्शन तज्ञ ब्रिजेश यादव व टीमने केले.६३ मुन्स टेक्नॉलॉजी,स्टेम लर्निंग मुंबई द्वारा संचलित सायन्स सेंटरचे ८० हून अधिक प्रयोगही विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी मांडले होते त्यासंबंधी प्रयोगांचे सादरीकरण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व स्टेम लर्निंगचे मनोज चव्हाण यांनी केले.प्रयोगशील विचार आणि स्वअनुभवातून शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत विज्ञानात रुची असलेले जिल्ह्यातील शंभरहून अधिक उपक्रमशील विज्ञान शिक्षक तसेच परिसरातील शाळांचे तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक अशा वैज्ञानिक संकल्पनांची विविध कृतीयुक्त सत्रे यामध्ये घेतली. यामध्ये विज्ञानावर आधारित खेळ इत्यादींचाही समावेश करण्यात आला होता.
शिक्षक प्रशिक्षणात व्हिआर सेटचा अध्यापनात वापर, टॅबद्वारे अध्यापन ,शैक्षणिक अ‍ॅप्स, सजीव मॉडेल्स,मराठी व इंग्रजी भाषेतील व्हिडिओज प्रेझेंटेशन,अ‍ॅनिमेशन, प्रयोगशाळेची डिजिटल टूर, व्हिआर हेडसेटमध्ये मोबाईल बसवून दिलेल्या अ‍ॅप्स/व्हिडिओज पाहणे,इन्फ्रानेट नसताना व्हिडिओचा वापर करणे (ऑफलाईन मोड) याची माहिती देण्यात आली.या उपक्रमासाठी देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली,शालेय समिती,जिल्हा परिषद शिक्षण विभाग,सिंधुदुर्ग,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग,गट शिक्षणाधिकारी पं.स.सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे सहकार्य मिळाले. सहभागी सर्वांना संस्थेचे उपाध्यक्ष तथा न्हावेली गावचे तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष आनंद नाईक यांच्यातर्फे जेवणाची तर पेंडुर गावचे शिक्षणप्रेमी भरत कवठणकर, शालेय समिती अध्यक्षा आनंदी गावकर आणि शाळेचा स्टाफ यांच्यातर्फे चहा,नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना अभिनव अकॅडमी सावंतवाडी यांच्याकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेचे विज्ञान शिक्षक तथा कार्यशाळेचे समन्वयक पांडुरंग काकतकर यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून यशस्वी झालेल्या या उपक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र पुणे या संस्थेकडून कार्यशाळेसाठी एक लाख खर्च करण्यात आला यातूनच प्रयोग साहित्य व शाळेला व्हि.आर.सेट प्रदान करण्यात आला. वैज्ञानिक विचारांची देवाण घेवाण करणाऱ्या स्तुत्य कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रदीप सावंत तर पांडुरंग काकतकर यांनी कार्यशाळेचा उद्देश विशद केला.यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथींनी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.