जोतिबा प्राधिकरण आराखड्याचा आढावा
कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीमुळे थांबलेल्या श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण सुधारित आराखड्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. या आराखाड्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. आराखड्याच्या प्रक्रियेला गती देण्याची सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत केली.
श्री क्षेत्र जोतिबा आणि परिसरातील 23 गावांच्या प्राधिकरणाला शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा आराखडा तयार केला असून तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली 6 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली होती. यानंतर 27 सप्टेंबर रोजी जोतिबा मंदिराच्या 1800 कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबईत मुख्य सचिव नितीन करीर, अप्पर मुख्य वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता, अर्थ विभागाचे प्रधान सचिव तथा कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा, वनविभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासमोर झाले. त्यावेळी जोतिबा मंदिर आराखड्यामध्ये बांधकाम विभागाने रस्त्यांसंदर्भातील जबाबदारी घ्यावी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची हजारो एकर जागा आहे. डोंगर परिसरात कोणकोणत्या ठिकाणी जागा आहेत, याचा शोध घ्यावा अशी सूचना केली होती. डोंगर जैवविविधतेने नटलेला असताना आराखड्यामुळे त्यात बाधा येऊ नये, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी, पायवाटा मजबुतीकरणाला प्राधान्य द्या, विकासकामे करताना वास्तू व परिसराचे महत्त्व, हेरिटेज लूक कायम ठेवा अशा सूचना केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन सूचना केल्या. राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे सामाजिक वनिकरण विभागांशी सामंजस्य करार करावा लागणार असून त्यासाठी गती द्या, मंदिरात भाविकांच्या सुविधांचा आराखड्यात समावेश करा, असे सांगत पुढील आठवड्यात सुधारित आराखडा शासनाला सादर करण्याची सूचना केली.