स्थानिक स्वराज्य संस्थांचा नगरविकास खात्याकडून आढावा
सात जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांची जिल्हा पंचायतमध्ये बैठक
बेळगाव : प्रादेशिक आयुक्तांच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांमधील सर्व शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक जिल्हा पंचायत कार्यालयात पार पडली. स्थनिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमधील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. नगरविकास खात्याच्या संयुक्त संचालकांच्या आदेशावरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयएएस अधिकारी मोहम्मद सल्लाउल्ला, राज्यलेखा परीक्षण विभागाचे नियंत्रण अधिकारी आर. एस. पांडे, आयएएस अधिकारी उज्ज्वलकुमार घोष यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झाली.
पाचव्या राज्य आर्थिक आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार नारायण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलाविण्यात आली होती. बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव, बागलकोट, विजापूर, हावेरी, गदग, धारवाड, कारवार या सात जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्याप्तीमधील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यंदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारकडून देण्यात आलेल्या विकास निधीमधील झालेला खर्च, सध्याची आर्थिक परिस्थिती, महसूल वसुली, महसूल वाढीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पायाभूत सुविधा व सेवा याबाबत जिल्ह्यानुसार अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.
बेळगाव महानगरपालिकेसह सात जिल्ह्यांतील नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी अधिकाऱ्यांकडून नागरिकांसाठी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सध्या असणारा पाणीसाठा व भविष्यातील समस्येला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, कूपनलिकांचे सर्वेक्षण, विहिरींचे सर्वेक्षण, विकास आदींची माहिती देण्यात आली. पाण्याच्या स्त्राsतांचा आढावा जाणून घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारकडून देण्यात आलेला निधी, त्यामधून केलेला खर्च व शिल्लक असलेल्या निधीची माहिती जाणून घेण्यात आली.