पोलीस महासंचालक डॉ.सलीम यांच्याकडून बेळगावात आढावा
बेळगाव : राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांनी पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. विशेषकरून प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्याची सूचना केली. त्याचबरोबर गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. पोलीस महासंचालकपदी वर्णी लागल्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. एम. ए. सलीम पहिल्यांदाच बेळगावच्या दौऱ्यावर आले आहेत. बेळगावात पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बंदोबस्तासाठी बेळगावचे तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांच्यासह काही अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते.
गणेशोत्सवापाठोपाठ मुस्लीम बांधवांचा ईद ए मिलाद हा सणदेखील शांततेत पार पडला. या दोन मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या केले. त्यामुळे पोलीस आयुक्तांसह शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे महासंचालकांनी कौतुक केले. त्याचबरोबर प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठीही अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, निरंजनराजे अरस यांच्यासह शहरातील सर्व साहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.