व्यापार परवान्यांच्या माध्यमातून मनपा तिजोरीत 127 कोटींचा महसूल
बेळगाव : महापालिकेचा व्यापार परवाना घेण्यासाठी महापालिका अधिकारी आक्रमक बनले असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. नूतन व्यापार परवाना आणि नूतनीकरणाच्या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाकडे आतापर्यंत 127.52 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. कारवाईच्या धास्तीने शहरातील व्यावसायिक परवाना घेण्यासाठी महापालिकेत गर्दी करताना दिसत आहेत. महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. थकीत घरपट्टी वसूल करण्यासह महापालिकेच्या हद्दीत व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेचा परवाना घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. काही व्यापारी आपल्याकडे उद्यम परवाना असल्याचे सांगत आहेत. मात्र, उद्यम परवाना असला तरी महापालिकेचा व्यापार परवाना आवश्यक असल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
मध्यंतरी यावरून वादावादीच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र, आता सातत्याने केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे लोक स्वत:हून मनपाचा व्यापार परवाना घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य स्थायी समितीच्यावतीने आरोग्य विभागाला व्यापार परवान्यांच्या माध्यमातून 4 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याने स्थायी समिती बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांसह निरीक्षकांना धारेवर धरत त्यांचे वेतन थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने सक्रिय होत व्यापार परवाना घेण्यासाठी जागृती केली. त्यामुळे आतापर्यंत नूतन व्यापार परवाना आणि परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून 127 कोटी 52 लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांकडे मनपाचा परवाना नाही, असे व्यापारी परवाना घेण्यासाठी महापालिकेत गर्दी करत आहेत.
जानेवारीत तब्बल 25 लाखांचा महसूल जमा
नोव्हेंबर महिन्यापासून मनपाचा व्यापार परवाना घेण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या व्यापार परवान्यांतून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत जानेवारी महिन्यात सर्वाधिक महसूल महापालिकेला जमा झाला आहे. जानेवारी महिन्यात तब्बल 25 लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.