For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात निर्दोष

01:26 PM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात निर्दोष
Advertisement

पणजी : लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून भाजपचे पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कोणताही पुरावा नसल्याने मेरशी येथील विशेष न्यायालयाने हा निवाडा दिला असल्याचे निकालपत्रात म्हटले आहे. गेली 10 वर्षे हा खटला चालू होता. वर्ष 2016 मध्ये त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आली होती. मंत्री बाबुश मोन्सेरात हे 2016 मध्ये सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार होते. त्यावेळी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्याला गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार मोन्सेरात यांच्या विरोधात दिली होती. तिच्या आईने तिला मोन्सेरात यांना विकल्याचाही आरोप तिने केला होता. त्यावेळी गोवा पोलिसांनी मोन्सेरात यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 376 म्हणजे बलात्कार केल्याच्या कायद्याखाली पोक्सो गुन्हा नोंदवला, अटक केली व लगेच त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

Advertisement

या खटल्यात 40 साक्षीदारांचे म्हणणे नोंदवण्यात आले. पोलिसांनी 250 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खटला चालू असताना मुलीच्या वयाचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्यावरून वाद समोर आल्याने मुलीची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिचे वय जास्त असल्याचे आढळले आणि ती अल्पवयीन नसल्याचे कळताच बाल कायद्यातील कलमे मोन्सेरात यांच्या गुन्ह्यातून वगळण्यात आली. तथापि खटला मात्र पुढे चालूच ठेवण्यात आला. मोन्सेरात यांच्या सोबतच सहआरोपी रोझारिया फेरेस यांनाही न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. बचाव पक्षाचे वकील दामोदर धोंड यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने अनेकवेळा विधाने बदलली. काही विधाने परस्पर विरोधी होती. मुलीच्या आईनेदेखील तक्रार खोटी असल्याची कबुली न्यायालयासमोर दिल्यामुळे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे शंका निर्माण झाली आणि खटला टिकला नाही.

न्यायालयावर विश्वास होता...

या खटल्यामुळे बलात्काराच्या आरोपामुळे गेली दहा वर्षे आपल्या कुटुंबाने मानसिक त्रास सहन केला. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि शेवटी आपणास निर्दोष ठरवल्याने आपण सर्व आरोपातून मुक्त झालो आहे.

- बाबुश मोन्सेरात, महसूलमंत्री

Advertisement
Advertisement
Tags :

.