For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mahabaleshwar News | पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

05:25 PM May 29, 2026 IST | NEETA POTDAR
mahabaleshwar news   पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर  तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
Advertisement

                    महाबळेश्वर-पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर कारवाई

Advertisement

पाचगणी (इम्तियाज मुजावर ) -महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने मोठी कारवाई सुरू करत आज सिडनी पॉईंट परिसरातील एका भव्य बंगल्यावर बुलडोझर चालवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून ही धडक कारवाई सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पोEWSलीस बंदोबस्त, जेसीबी आणि मशिनरीच्या सहाय्याने सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिडनी पॉईंटजवळील अनिल विजय मडगावकर यांच्या मालकीचा बंगला महसूल विभागाने अनधिकृत असल्याचे सांगितले आहे. या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने संबंधित बांधकाम हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.

Advertisement

आज सकाळीच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बंगल्याचे पाडकाम सुरू करण्यात आले. कारवाई सुरू होताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे समर्थन केले, तर काहींनी अचानक सुरू झालेल्या पाडकामाबाबत आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान, संबंधित बंगला मालक अनिल विजय मडगावकर यांनी प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. गोव्यात शिपिंग व्यवसाय करणारे मडगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझ्याकडे या बांधकामाचे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता प्रशासनाने अचानक कारवाई सुरू केली आहे. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आलेली नाही.”

मडगावकर यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी संबंधित कागदपत्रे आणि परवानग्यांची माहिती लवकरच सार्वजनिक करणार असल्याचे सांगितले.

महाबळेश्वर-पाचगणी हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर मानला जातो. त्यामुळे या भागात बांधकामांसाठी अनेक नियम आणि निर्बंध लागू आहेत. गेल्या काही वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत अशा बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.

महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे आता परिसरातील इतर संशयित बांधकामधारकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून पुढील काही दिवसांत आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारच्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तहसीलदार सचिन मस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या कोणत्याही बांधकामाला प्रशासन पाठीशी घालणार नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच कारवाई केली जात आहे.”

या संपूर्ण कारवाईमुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.