For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंथ रेड्डी; गुरुवारी होणार शपथविधी

07:25 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंथ रेड्डी  गुरुवारी होणार शपथविधी
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे परिणाम गेल्या रविवारी समोर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींचे केंद्र दिल्लीत स्थलांतरीत झाले आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेसने खासदार रेवंथ रेड्डी यांची निवड केली आहे. त्यांचा शपथविधी येत्या गुरुवारी होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एक किंवा दोन उपमुख्यमंत्री राहतील अशी शक्यता आहे. 12 आमदारांचा समावेश प्रथम मंत्रिमंडळात केला जाणार असून  त्यांना त्याच दिवशी पदांची शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.

त्यांच्या नावाला प्रथम काँग्रेसच्या किमान तीन ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना विरोध केल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. तथापि, अंतिमत: रेड्डी हेच मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठीचा वादही सोडविण्यात आल्याचीमाहिती पक्षांतर्गत सूत्रांकडून दिली मंगळवारी दिली गेली.

Advertisement

राजस्थानात स्पर्धा

या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले असून मुख्यमंत्रीपदासाठी चुरसही निर्माण झाली आहे. वसुंधराराजे सिंदिया यांनी या पदासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत, अशी चर्चा आहे. त्यांनी 75 आमदारांशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे. तथापि, त्यांना योगी बालकनाथ यांच्याकडून स्पर्धा आहे. अंतिम निर्णय एकदोन दिवसांमध्ये होऊ शकेल.

मध्यप्रदेशात पुन्हा ‘शिव’राज ?

मध्यप्रदेशात भारतीय जनता पक्षाला भरभक्कम बहुमत मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिलेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याच गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार अशी चर्चा आहे. तथापि, अद्याप अधिकृतरित्या काहीही माहिती देण्यात आलेली नाही. आपण मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत कधीही नव्हतो आणि आत्ताही नाही, असे विधान शिवराजसिंग चौहान यांनी केले आहे.

छत्तीसगडमध्ये कोणाच्या हाती सूत्रे ?

या राज्याचे सलग 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, असे मानले जात आहे. त्यांच्यास्थानी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार यासंबंधी उत्सुकता आहे. कदाचित वनवासी समाजातील महिलेची निवड होण्याची शक्यताही व्यक्त झाली आहे.

मिझोराममध्ये 8 ला शपथविधी

मिझोरामध्ये झोराम पीपल्स पक्षाचा विजय झाला असून त्याने 40 पैकी 27 जागा प्राप्त केल्या आहेत. या पक्षाचे नेते लादूहोमा यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी 8 डिसेंबरला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चार मंत्र्यांनीही शपथ दिली जाईल.

रेवंथ रेड्डी  हे कोण ?

रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. या संघटनेतूनच त्यांच्या सामाजिक कार्याला प्रारंभ झाला. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1969 या दिवशी झाला. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. 2008 मध्ये ते प्रथम आंध्र प्रदेश विधानपरिषदेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी तेलगु देशम पक्षात प्रवेश केला. 2009 मध्ये ते विधानसभचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांची तेलगु देशम विधीमंडळ पक्षनेतेपदी नुयक्ती करण्यात आली. 2017 मध्ये त्यांना या पदावरुन हटविण्यात आल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता 2023 मध्ये ते मुख्यमंत्री होण्यास सज्ज झाले आहेत.

Advertisement
Tags :

.